नीट पेपर फुटीप्रकरणी आरोप केलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा
लातूर : लातूर शहरातील त्रिपुरा महाविद्यालयातील माजी कर्मचाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन नीट पेपरफुटी प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आरोप केलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेनाचे लातूर शहर प्रमुख एड. परवेज पठाण, दिनेश बोरा यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
लातुरात घडलेल्या या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन या विषयाला वाचा फोडण्याचे निर्देश बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव यांनी परवेज पठाण व दिनेश बोरा यांना दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार सदर निवेदन देण्यात आले आहे. त्रिपुरा महाविद्यालयातील माजी कर्मचारी सांबदेव जोशी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन नीट पेपर फुटीप्रकरणी अनेकांची नावे घेऊन गंभीर आरोप केले आहेत. सदर पेपर फुटीप्रकरणी जोशी यांनी ज्या - ज्या व्यक्तींची नावे घेतली आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची आग्रही मागणी निवेदनात केली आहे. लातूरची ओळख शैक्षणिक पंढरी अशी आहे. या प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक परंपरेला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. जोशी नामक व्यक्ती स्वतः आरोपाची कबूली देत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर शहर प्रमुख एड. परवेज पठाण, दिनेश बोरा यांसह जिल्हा संघटक एड. संजय मुर्गे ,
शहर संघटक एड. बालाजी सूर्यवंशी, महिला जिल्हा प्रमुख सौ. सविता स्वामी, शहर प्रमुख सौ. मीनाक्षी मुंदडा, श्रीनिवास लांडगे, सौ. बबिता गायकवाड, सौ. सुचेता अंधारे, सौ. लक्ष्मी काकणे ,सौ. शोभा कदम, वेदिका पाटील, सदाशिव गव्हाणे,विजयकुमार कांबळे, आबा उपाडे ,अंकुश कांबळे, योगेश बेंबडे, वंदना गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.