जागतिक स्मरण दिनानिमित्ताने रस्ते सुरक्षा आणि अपघातविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन
माझं लातूर परिवार व प्रादेशिक परिवहन विभागाचा संयुक्त उपक्रम
लातूर :- रस्ते अपघातात जगभरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्मरण दिन म्हणून जगभर पाळला जातो. त्या अनुषंगाने माझं लातूर परिवार आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल, अशोक हॉटेल या ठिकाणी रस्ते सुरक्षा, अपघात विषयक मार्गदर्शन आणि जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, आशुतोष बारकुल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, मनोज लोणारी, शहर वाहतूक पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी, आयुब शेख यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
या जनजागृती शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.