कोश्यारी यांच्या निषेधार्थ लातूर बंद;शिवप्रेमींच्या बैठकीत निर्णय
लातूर, प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वकतव्याच्या निषेधार्थ २५ नोव्हेंबर रोजी लातूर शहर बंद करण्याचा एकमुखी निर्णय शिवप्रेमींच्या वतीने बुधवारी येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला.
राजीव गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी सायंकाळी या संदर्भात तातडीची बैठक घेण्यात आली त्यात या नियोजीत बंदवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बंद शंभर टक्के यशस्वी व्हावा व त्यात सर्वांचा सहभाग असावा यासाठी बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली. अनेकांनी मते मांडली व सुचनाही केल्या. व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, विद्यार्थी वाहतुक संघटना, अॅटोरिक्षा युनियन, आडत व्यापारी संघटना, फ्रुट मार्केट असोसिएशन, भाजीपाला मार्केट असोसिएशन, शिकवणी वर्ग यांना या बंदबाबत अवगत करण्यासाठी त्यांना पत्र देण्यात येणार आहेत व या दिवशी त्यांचे व्यव्हार व प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवावीत याची विनंतीही त्यांना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या बंदच्या दिवशी त्यांचा भाजीपाला, धान्य लातुरच्या बाजारात विक्रीस आणू नये अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवराय हे विश्ववंद्य असून त्यांच्या कार्य व शौर्याची थोरवी जगाने गायली आहे. यापूर्वीही महापुरुषांबद्दल कोश्यारी यांनी अवमानकारक विधाने केली आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यास महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही. जनेतेची ही भावना लक्षात घेवून केंद्रसरकारने भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावे यासाठी जिल्ह्यातील खासदार व आमदारांना शिवप्रेमींच्या वतीने निवेदन देण्याचेही या बैठकीत ठरले. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रसरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा व कोणत्याही मंत्र्याना फिरू न देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मोठ्या संख्येत शिवप्रेमींची उपस्थिती होती.