दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका
जन्मठेप भोगणाऱ्या ६ दोषींची शिक्षा माफ करत सर्वोच्च न्यायालयाचे सुटकेचे निर्देश
...21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये असंच काहीसं घडलं. जे घडलं ते भीषण होतं. 30 वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती मुलगी राजीव यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि.... आसमंत हादरला, कानठळ्या बसणारा एक स्फोट झाला.
श्रीपेरंबुदूरमध्ये झालेल्या त्या भयंकर स्फोटावेळी तामिळनाडूतले काँग्रेसचे जी. के. मूपनार, जयंती नटराजन आणि राममूर्ती हे तीनही नेते उपस्थित होते. धूर सरल्यावर राजीव गांधींचा शोध सुरू झाला. त्यांच्या शरीराचा काही भाग छिन्नविच्छिन्न होऊन पडला होता. राजीव यांचं कपाळ फुटल्यानं नीटसं काहीच लक्षात येत नव्हतं. पण, डोक्यातून बाहेर आलेला त्यांचा मेंदू त्यांचे सुरक्षा अधिकारी पी. के. गुप्ता यांच्या पायावर पडला होता. गुप्ता यांना त्याची जाणीव असायचा प्रश्नच नव्हता. कारण, ते स्वतःच शेवटच्या घटका मोजत होते.
अशा या महाभयंकर स्फोट घडवून आनणारे देशातील बहुचर्चित दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी मुख्य सुत्रधार
जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. तामिळनाडू सरकारने या दोषींची शिक्षा माफ करून त्यांच्या सुटकेची शिफारस केली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचे दोषींनी स्वागत केले, तर काँग्रेसने न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली.
नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन, संतन, मुरुगन, पेरारिवलन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे राजीव गांधी हत्याकांडातील दोषी आहेत. यापैकी नलिनी, रविचंद्रन, पेरारिवलन यांनी ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. उर्वरित दोषीदेखील २३ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. तामिळनाडू सरकारने २०१८ साली आपल्या अधिकाराअंतर्गत या दोषींची शिक्षा माफ करत त्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांनी
या निर्णयाला मंजुरी नाकारली. याविरोधात पेरारिवलनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने १८ मे रोजी त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. याच आधारावर इतर दोषींनीदेखील न्यायालयात धाव घेतली. पेरारिवलनच्या सुटकेचे निकष आम्हालादेखील लागू होत असल्याचा त्यांचा युक्तिवाद होता. राज्य सरकारनेदेखील या दोषींच्या मागणीचे समर्थन केले होते. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती नागरला यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य करत सहा
दोषींच्या सुटकेचे निर्देश दिले. कैद्यांच्या शिक्षा कपातीबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना मानने बंधनकारक आहे. पेरारिवलनच्या सुटकेसाठी दिलेले निर्देश इतर याचिकाकर्त्यांसाठी देखील लागू होतात. त्यामुळे त्यांची शिक्षा पूर्ण झाल्याचे गृहीत धरून त्यांची सुटका करण्यात यावी, असे खंडपीठ म्हणाले. तुरुंगात असताना या दोषींची वर्तणूक चांगली होती आणि त्यांनी विविध विषयांचा अभ्यास केल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.
तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूर येथे २१ मे १९९१ रोजी एका निवडणूक सभेवेळी आत्मघातकी बॉम्बस्फोटाद्वारे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात धनू नामक आत्मघातकी हल्लेखोरासह १६ जण मृत्युमुखी पडले होते. कनिष्ठ न्यायालयाने एकूण २६ जणांना मृत्युदंड ठोठावला. मात्र १९९९ साली सर्वोच्च न्यायालयाने १९ लोकांची मुक्तता करत सात जणांना दोषी ठरवले. त्यापैकी नलिनी, पेरारिवलन, मुरुगन आणि संतन यांची मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली, तर रविचंद्रन, पायस आणि जयकुमार यांना जन्मठेप ठोठावण्यात आली.
२००० साली नलिनी हिची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलण्यात आली. तर २०१४ साली न्यायालयाने दया याचिकांवरील निर्णयास उशीर केल्याच्या आधारावर पेरारिवलन, संतन आणि मुरुगन यांच्या फाशीच्या शिक्षेचेही जन्मठेपेत रूपांतर केले होते.