Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

" पालकांनो वेळीच सावध व्हा”

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
" पालकांनो वेळीच सावध व्हा”





दि. १४ नोहेंबर रोजी संपुर्ण भारत देशात आपल्या स्वतंत्र देशाचे पहीले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करतो. त्यांना लहान मुले आवडत असल्यामुळे त्यांची जयंती ही बाल दिन म्हणुन साजरी करतो. बालक दिनाच्या निमीत्ताने सर्व बालकांना हार्दीक शुभेच्छा. बालकांचा सर्वांगीण विकास याची लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बालकांचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शारीरीक, मानसीक व सामाजीक वाढीवर अवलंबुन असते.

बालरोग तज्ञ असल्या कारणामुळे ब-याच पालकांचा व बालकांचा खूप जवळुण संबंध आला. तसेच समाजात वावरत असताना सहजच लक्ष बालकांच्या हालचालीकडे जाते व त्यात असे निदर्शनास आले की १ वर्ष ते १० वर्ष वयोगटातील मुले त्यांचा ५० ते ६० टक्के वेळ टिव्ही व मोबाईल बघण्यात घालवतात व टिव्ही व मोबाईल मधे काय पाहतात हे पाहण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात आले की ८० ते ९० टक्के बालके हे कार्टुन व व्हिडीओ पाहण्यात मग्न असतात. टिव्ही व मोबाईल पाहताना हे इतके मग्न असतात की त्यांच्या अवतीभोवती काय चालले आहे याची त्यांना खबर ही नसते. मागे आपण वृत्तपत्रात एक बातमी वाचली होती की एक पाच वर्षाचा मुलगा मोबाईल पाहण्यात एवढा मग्न झाला मी त्याला शी व सु झालेले ही समजले नाही. आजच्या मुलामध्ये मोबाईल व टिव्ही पाहणे हे एक व्यसन झाले आहे. जसे दारू, सिगारेट किंवा तंबाखुपेक्षाही भयानक त्यात करोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनमुळे हे अधीकच वाढलेले आहे. करोनाच्या काळात शाळा ही ऑनलाईन झाल्यामुळे मुलांच्या हाती सहजच मोबाइल आला आणि त्याचे मुलांना एवढे व्यसन लागले की ते सोडवणे अवघड जात आहे. सतत टिव्ही किंवा मोबाईल मधे मग्न असल्यामुळे साहजिकच आहाराकडे, व्यायामाकडे, अभ्यासाकडे व घरातल्या माणसांकडे दूर्लक्ष होत चालले आहे. तसेच आजच्या फास्टफुडच्या जमाण्यात सकस आहाराकडेही दूर्लक्ष होत चालले आहे. विभक्त कुटुंब पदधती असल्याकारणाने व आई व वडील दोघेही नौकरी करत असल्याकारणाने घरातील मुल एकटे असते व त्यामुळे तो मोबाईल व टीव्ही च्या आहारी गेला आहे. प्रत्येक पालकांना एक किंवा दोन मुले असल्यामुळे त्यांचे अवास्तव फाजील लाड पुरविले जात आहेत. काही घरात तरी मुले म्हणेल ती पुर्वदिशा आणि याचाच परिणाम म्हणुन मुलांमध्ये चिडचिडपणा, हटटीपणा, उदधटपणा, आळशीपणा वाढत आहे २० ते ३० टक्के मुले याला अपवाद आहेत पण हे प्रमाण खुप कमी आहे. सतत मोबाईल वर कार्टुन किंवा गेम्स पाहील्यामुळे व पाहीजे ते हटट पुरवल्यामुळे मुलांमधील भावना कमी होत चालल्या आहेत आणि ही भविष्यातील सर्वात मोठी चिंता आहे. ब-याच घरातील वृदधांना काही धार्मीक कार्यक्रम तसेच बातम्या बघायच्या असतील तरीही मुलांच्या हटटामुळे त्यांना पाहवयास मिळत नाहीत ही सत्य परीस्थीती आहे.

मुलांना म्हणेल ती वस्तु मिळत गेल्यामुळे त्यांना परिस्थीतीची जाणीव राहत नाही. तसेच वयाप्रमाणे जबाबदारी घेण्याचीही सवय लागत नाही आणि हीच मुले पुढे जाउन परिस्थीतीला सामोरे न जाउ शकल्यामुळे नैराश्य व आत्महत्तेला बळी पडतात.

 आमच्या बालरोगतज्ञाच्या म्हणण्यानुसार जवळजवळ ९५ टक्के मेंदुची वाढ ही ६ वर्षे पर्यंत होते. म्हणुन पहिले सहा वर्षे हे बाळाच्या जडणघडणीत खुप महत्वाचे आहेत. म्हणुनच त्याला सकस आहार चांगले संस्कार तसेच अध्यात्माची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. जन्मापासून ६ वर्षे वयापर्यंत तो जो ऐकतो, पाहतो, बोलतो याचा त्याच्या बालपणाच्या जडण घडणीवर खूप प्रभाव पडतो पुर्वीच्या काळात मोबाइल उपलब्ध नसल्यामूळे दूरदर्शण वर महाभारत, रामायण इ सीरीयल पाहायला मिळायच्या तसेच आज्जी आजोबांकडुन शिवाजी महाराज, झाशीची राणी तसेच ज्ञानेश्वर माउली, तुकाराम महाराज ई. संतांबददल माहीती सांगीतली जायची व याचा बाल मनावर निश्चीतच चांगला प्रभाव पडत होता. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात पालकांचा व मुलांचा पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा वाढला आहे. आज खुप कमी घरामध्ये अध्यात्माची आवड जोपासली जाते, बरेच जण याला अंधश्रदधाही समजतात. आजची मुले ही आधुनिक तंत्रज्ञानात खुपच हुशार आहेत तसेच त्यांचा मेंदु ही खुप प्रगल्भ आहे पण त्याला दिशा व्यवस्थीत मिळणे गरजेचे आहे. टिव्ही व मोबाईलवर ही काय पहावे हे पालकांना ही कळायला हवे. सध्या "ज्ञानेश्वर माउली” ही मालीका अतिशय सुंदर सुरू आहे ती जर आपण स्वत:हा बसूण मुलांना पाहावयास दिली तर मुलांवर खरच चांगले संस्कार होतील. ज्ञानेश्वर माउली या मालिकेमधील चारही भावंडाचे बोलणे, वागणे, सहनशिलता, संयम खरच शिकण्यासारखा आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या बोलण्यामध्ये खुपच गोडवा आहे म्हनुणच ती सर्व जगाची माउली आहे. त्यातला ०.१ टक्का जरी गुण आपल्या आचरणात आणला तरी आपले आयुष्य सुलभ होणार आहे, तसेच पुर्वी दाखवण्यात येणारी ताराराणी या मालीकेतील राणी ताराराणी यांचा शुरपणा, निर्भयपणा तसेच निर्णय क्षमता, बोलण्याची वकीब वाखानण्याजोगी होती, खरोखरच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूशा शोभतात. माफ करा कुठल्याही टीव्ही चॅनलची जाहीरात करण्याचा माझा हेतु नाही. या मालीकेतुन आपल्याला व आपल्या मुलांना खुप काही शिकण्यासारखे आहे नक्कीच या गोष्टी कार्टून किंवा व्हिडीओ गेम बघुन मिळणार नाहीत. म्हणून मुलांनी काय करावे किंवा काय करू नये याची जाणीव पालकांना असणे खुप जरूरी आहे. आजच्या काही मुलांना ज्ञानेश्वर माउली, तुकाराम महाराजांसारख्या संतांची ओळखही नाही हीच खरी खंत आहे, म्हणून पालकांनो आनखी वेळ गेलेली नाही, आपल्या मुलांना लहान वयात अशा गोष्टी दाखवा, ऐकवा किंवा करू दया जेणे करूण त्यांना दैनंदीन जिवनात मदत होईल, व जिवन जगण्याचा मार्ग सापडेल. आपल्या मुलांचे ८० टक्के भवीष्य हे पालकांच्याच हातात आहे. म्हणून पालकांना ही विनंती आहे की आतापासूनच सतर्क राहा व मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभागी व्हा.

“पालकच हे आपल्या पाल्यांचे शिल्पकार आहेत”



 डॉ. विद्या रामेश्वर कांदे MBBS, MD(बालरोग)
  प्रोफेसर व विभाग प्रमुख                                            एमआयएमएसआर वै. महाविद्यालय लातुर.
९३२६७१४४७०
Previous Post Next Post