सोलापुरात हॉटेलमध्ये लातूरचे अतिरिक्त सीईओ जाधव यांच्या पत्नीची गळफास घेवूनआत्महत्या
सोलापूर : लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ प्रभू जाधव यांच्या पत्नीने सोलापुरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पुढील महिन्यात १८ डिसेंबर रोजी त्यांच्या मुलाचा विवाह आहे. त्याच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी पती- पत्नी चडचण येथे शनिवारी गेले होते. रात्र झाल्यामुळे ते सोलापुरातील सोरेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले आहे. हॉटेलात त्यांनी साडीने गळफास घेतल्याचे समजते आहे.विजापूर नाका पोलिसांनी या घटनेची प्राथमिक नोंद घेतली आहे. स्नेहलता जाधव यांचे पती प्रभू जाधव हे सोलापुरात पाच, सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन विभाग) होते. सध्या ते लातूर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात.स्नेहलता जाधव यांच्या मागे पती, मुलगा रोशन, मुलगी मेघा असा परिवार आहे. ते लातूर येथे राहतात. शनिवारी स्नेहलता व त्यांचे पती चडचण येथे लग्नाच्या बस्ता बांधण्यासाठी आले होते. पुन्हा सोलापुरातून जाताना रात्री उशीर झाल्यामुळे सोरेगाव परिसरातील लॉजमध्ये थांबले होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे दिशा विभागाची मीटिंग असल्यामुळे लातूरला गेले होते. त्यांचा मुलगा रोहन हा सोलापुरात आईला घेण्यासाठी आला होता. याशिवाय त्यांना दुपारी सोन्याचे दागिनेही खरेदी करायचे होते.मात्र, रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने आईला फोन केला असता फोन लागला नाही. तो हॉटेलमधील रूमवर गेला व नंतर दरवाजा ठोठावला असता आतून काही प्रतिसाद आला नाही. दरवाजा उचकटून पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
विजापूर नका पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. स्नेहलता यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.