Ads by Eonads
जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांचे विमा संरक्षण द्यावे आ. अभिमन्यू पवार यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
लातूर/ औसा: महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्क होते. या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला २०१२ साली निश्चित - केलेल्या प्रति कुटुंब प्रति वर्ष १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. या योजनेला १० वर्षांचा काळ उलटला असून, विमा कवच वाढवून ५ लाख करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
आ. अभिमन्यू पवार यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जन आरोग्य योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या योजनेअंतर्गतच्या विशेष सेवांतर्गत १७७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गतचे विमा कवच वाढवून ५लक्षरुपये करण्यात यावे. उपचारासाठी तालुकानिहाय नवीन रुग्णालये योजनेशी जोडण्यात यावेत. अशीही मागणी केली आहे..
जन आरोग्य योजनेत २९९६ आजारांचा समावेश असून, आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर १२०६ आजारांचा समावेश करण्यात यावा. तसेच आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना जन आरोग्य कार्ड्स वितरित करण्यात यावेत अशीही मागणी केली. याबाबतच्या मागण्यांच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याची सूचना संबंधितांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.