गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आई-वडिलांचे भांडण सोडवणाऱ्या मुलीचा खून करणाऱ्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर- आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीस आरोपी वडील सुधीर शंकर बंडगर, वय 40 वर्ष, राहणार आशिव तालुका औसा यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक 15 नोव्हेंबर 2020 रोजी औसा तालुक्यातील आशिव येथे राहणारा सुधीर बंडगर याचा त्याच्या पत्नीसोबत सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भांडण सुरू होते. सदरचे भांडण सोडवण्यासाठी त्यांची पंधरा वर्षीय मुलगी भांडणामध्ये आली असता शंकरने मुलीच्या दिशेने दगड फेकून मारला तो दगड मुलीच्या डोक्याला लागून मुलगी गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी मुलीला उपचार कामी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान ती मरण पावली होती.
नमूद आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे, भादा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 176/2020 कलम 302, 323, 506 भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच आरोपी शंकर बंडगर यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. सदर गुन्ह्याचा तपास भादा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केला. तपासा दरम्यान भरपूर परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून प्रत्यक्ष साक्षीदार तपासून गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले होते.
सदर गुन्ह्यामध्ये उत्कृष्ट तपास करत पोलिसांनी भक्कम साक्षीदार व भरपूर परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर केल्याने सदरची केस अंडर ट्रायल चालविण्यात आली.
पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात गोळा केलेले साक्षी,पुरावे तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन मा.जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी नमूद आरोपीस दोषी ठरवत दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सख्या मुलीचा खून करणाऱ्या पित्याला दोषी ठरवून मा.न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून नाते कोणतीही असो त्यांनी केलेले कृत्य हे माफ करता येत नाही हे याच्यावरून सिद्ध होते.
नमूद गुन्ह्यातील आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी भादा पोलीस स्टेशनचे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी संदीप भारती,त्यांना तपास
कामी सहाय्य करणारे पोलिस अंमलदार, भादा पोलीस ठाण्याचे सध्याचे प्रभारी अधिकारी विलास नवले,जिल्हा सरकारी वकील एस. एस.रांदड, कोर्ट मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी महिला अमलदार पुष्पा कोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.