खरोसा येथील जागतिक वारसा असणाऱ्या लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर
लातूर दि. (अभय मिरजकर)-
जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथील जगप्रसिद्ध लेणी हा जिल्हाचा वारसा आहे.परंतू केवळ उदासीनता, त्यातून होणारे दुर्लक्ष यामुळे हा वारसा लोप पावण्याची या स्थितीला आहे. वेळीच दखल घेतली नाही तर यापुढे इथे पण लेणी होती बरं का असं सांगण्याची वेळ लातूरकरांवर येईल असे वाटते.
"प्रत्येक गावाला काही ना काही वारसा असतो, परंतु त्याचे जतन करणे हे सर्वांच्या हाती असते. लातूर जिल्ह्याला समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभलेला आहे. पण काळाच्या ओघात आणि मानवाच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे हा वारसा लोप पावण्याच्या मार्गावर आहे. लातूर जिल्ह्यातील एैतिहासीक वारसा जतन करण्यासाठी केवळ प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यावर विसंबून न राहता नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे."
लातूर - निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण १२ लेणींचा समुह आहे.पहिली लेणी एक बौध्द लेणी आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध यांची बसलेल्या स्थितीत मूर्ती आहे. आज माञ बुद्धाची मुर्ती नवीन आहे, मुर्तीला रंग दिलेला आहे. दुस-या लेणींमध्ये शिवलिंग आहे.
वेरुळ अजिंठा लेणी घ्या अगोदर येथील लेणीं कोरण्यात आलेल्या आहेत. माञ येथील दगड ठिसूळ असल्याने त्या परिपूर्ण करण्यात आलेल्या नाहीत असे सांगितले जाते. बदामी येथील लेणीं प्रमाणेच खरोसा येथील लेणी आहेत. या लेण्याचा कालखंड कांहीजणांनी सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. काही जणांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा येथील लेणी सु. इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. तर काही जणांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सु. ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे.
आज या लेण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. धार्मिक स्वरूप देण्यात सर्व जण व्यस्त आहेत. त्यामुळे काही दिवसांत येथील लेणीं नामशेष होऊन मंदिरे उभी राहिलेली दिसून येतील. मुर्ती भग्न होत आलेल्या आहेत. जतन करण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. दारु पिण्यासाठी ठिकाण अशी अवस्था झाली आहे. फिरण्यासाठी जोडपी (मुले-मुली) आलेली दिसतात. काही स्तंभ नष्ट होत आहेत.