Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा

वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा
   
*माझं लातूर परिवाराच्या वतीने शाळेला संविधान उद्देशीका भेट

लातूर: औराद शहाजानी संस्कृती प्रतिष्ठान संचलित वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये ७३ वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.दत्ता माने यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी माझं लातूर परिवाराच्या वतीने भारताची संविधान उद्देशिका शाळेला भेट देण्यात आली. लातूर जिल्ह्यासह शेजारील नांदेड, सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील अनेक शाळांमध्ये गत वर्ष भरापासून माझं लातूर परिवाराच्या वतीने मोफत संविधान उद्देशीका वितरण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेतील बिरादार वेदांत, अदिती, रूद्र, वैष्णवी या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त भाषण केले. प्राचार्या डॉ.शारदा जाधव यांनी भारतीय संविधान, मसुदा समिती, संविधान सभा, समितीची रचना, घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद ,धर्मनिरपेक्षता व अखंडता या मूल्यांवर मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सविस्तर अशी माहिती सांगितली. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानातील भारतीय नागरिकांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार यावर विस्तृत मार्गदर्शन करताना देशातील प्रत्येक नागरिकांनी आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडले पाहिजे असे मत प्रा.दत्ता माने यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख बिलकेश यांनी केले तर आभार सोनाली बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post