राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे२४ ते २७ डिसेंबर, २०२२ आयोजन
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे च्या वतिने सदर स्पर्धांचे आयोजन दि. २४ ते २७ डिसेंबर, २०२२ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे करण्याचे निश्चित केलेले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकुण ९ विभागातून जवळपास ६५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉल सज्ज करण्यात आलेला असून सहभागी खेळाडूंची निवास व्यवस्था संकुलातील वसतीगृहामध्ये करण्यात आलेली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मा. डॉ राजेश देशमुख, भा. प्र. से., जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांचे अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन केलेली असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. लातूर, पोलीस अधिक्षक, पुणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक, जि. प. लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर हे काम करीत आहेत.
या स्पर्धेमध्ये मुंबई विभागाकडून आर्यन दवंडे, मानस मानकवळे पुणे विभागाकडून सिध्दांत कोंडे, रिया केळकर, रितिषा ईनामदार, श्रावणी पाठक, शिवछत्रपती क्रीडापिठाकडून आर्या परब, याशिका पुजारी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे पुणे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कौशल्ये जवळून पहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ उद्या दि. २४ डिसेंबर रोजी स. ११.०० वा. शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये मा. डॉ. सुहास दिवसे भा.प्र. से, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते, मा. श्री संजय शेटे, महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना यांचे अध्यक्षतेखाली, तसेच स्पर्धा संचालक योगेश शिर्के यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील विविध विभागामधून आलेल्या खेळाडूंचे स्वागत पुणे शहरातील क्रीडाप्रेमी नागरीकांनी करावे तसेच स्पर्धेसाठी पुणे शहरातील व जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू, नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेले आहे.