रस्ता सुरक्षा अर्थात आपलीच सुरक्षा…!
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी व त्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता परिवहन विभागाने "सुरक्षा" हा उपक्रम दि.01 डिसेंबर 2022 पासून पुढील सहा महिन्यांसाठी सुरू केला आहे. दि.01 ते दि.07 डिसेंबर 2022 या कालावधीत वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या विशेषतः अतिवेगाने वाहन चालविणे, विना हेल्मेट, विना सिटबेल्ट वाहन चालविणे आणि चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणे याबाबत वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. याकरिता परिवहन विभागातील 30 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून दोन्ही महामार्गावर 24 तास ही जनजागृती अंमलबजावणी करण्यात येत आहे.
*अतिवेगाने वाहन चालविणे*
मुंबई- पुणे या दोन्ही महामार्गावरील होणारे अपघातांमध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये मोठया प्रमाणात यापूर्वी जीवित हानी झालेली आहे. याकरिता अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना पहिले सात दिवस जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये कार, जीप ही खाजगी वाहने, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, टँकर, बसेस ही परिवहन वाहने त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावर मोटर सायकल या सगळ्या वाहन चालकांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुढे सुध्दा या सर्व चालकांची जनजागृती करण्यात येणार आहे. या जनजागृतीमध्ये यापुढे अतिवेगाने वाहन चालविणारे चालक यांनी खालापूर आणि उरसे या टोलनाक्यावर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. अशा चालकांना या समुपदेशन केंद्रावर अतिवेगाने वाहन चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत चित्रफित दाखवण्यात येणार असून त्या चालकांना रस्ता सुरक्षा विषयीची प्रश्नावली सोडवावी लागणार आहे आणि त्यानंतर वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले असून त्याचा क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या मोबाईलने हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर प्रश्नावली आणि शपथ मोबाईलवर उपलब्ध होणार असून, प्रश्नावली सोडविल्यानंतर गुणपत्रिका (प्रश्न-उत्तरे) आणि शपथ घेतल्यानंतर शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र लगेच उपलब्ध होणार आहे. सर्वोच्य न्यायालयाने गठित केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने वाहनधारकांना समुपदेशन करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
*सीटबेल्ट बाबत जनजागृती आणि अंमलबजावणी*
मुंबई-पुणे या दोन्ही महामार्गावरील वाहनांचा वेग हा इतर रस्त्यावरील वेगापेक्ष जास्त असल्याने येथे अपघात झाल्यानंतर सीटबेल्ट न वापरल्यास मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते, ही बाब विचारात घेऊन सीटबेल्ट बाबत जनजागृती अंतर्गत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांनी नेमणूक केलेल्या IRB या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे. खालापूर, उरसे, शेडुंग, सोमाटणे, वरसोली येथील प्रत्येक टोलनाक्यावर IITB कंपनीचे 30 कर्मचारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत टोलनाक्यावर सीटबेल्टबाबत जनजागृती करण्यात आली असून प्रत्येक वाहन चालक व त्यांच्या शेजारी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ते सीटबेल्ट लावले असल्याची खात्री केल्यानंतरच टोल प्लाझाहून त्यांना पुढे प्रवेश देण्यात आला आहे. ही जनजागृती करीत असताना असे दिसून आले की, चालक हे सीटबेल्ट लावत असून त्यांच्याशेजारी बसणाऱ्या व्यक्ती सीटबेल्ट लावत नव्हते, त्यांची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. यापुढे प्रवासी बसेसमध्ये सुध्दा प्रवाशांना सिटबेल्ट लावण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. बस उत्पादकाने ज्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी सीटबेल्टची व्यवस्था केलेली आहे त्या बसेसमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
*उजव्या मार्गिकेत कमी वेगाने चालणारी वाहने (उदा.ट्रक,बस,कंटेनर) वाहनचालकांच्या जनजागृतीबाबत*
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. डावीकडची मार्गिका ही कमी वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी असून मधली मार्गिका हलके मोटार वाहन जसे की, कार, जीप या वाहनांसाठी आहे. उजवी मार्गिका ही हलक्या वाहनांना ओव्हरटेकिंगसाठी आहे, असे असताना मोठ्या प्रमाणावर कंटेनर, बसेस ह्या उजव्या मार्गिकेतून धावताना आढळून येतात. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली असून वाहनचालकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शिस्तीचे वातावरण दिसून आले आहे. या संदर्भात प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही खाजगी व एसटी बसेस ह्या उजव्या मार्गिकेमधून धावताना आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी व खाजगी बसचालकांची जनजागृती होण्यासाठी एसटी महामंडळ यांच्यासोबत बैठक घेण्यात आली असून त्यांनी त्यांच्या चालकांना परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे खाजगी बस वाहतूक संघटना आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्याशी सुध्दा बैठक घेण्यात आली असून त्यांच्यास्तरावर सुध्दा चालकांची जनजागृती करण्यात येत आहे.
त्यामुळे या संदर्भात संबंधित चालकांकडून आणि त्यांच्या मूळ विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे यापुढे सुध्दा जनजागृती करून समुपदेशन करण्यात येणार आहे.
*खाजगी कार वाहनांमधून होणारी बेकायदेशीर वाहतूक*
मुंबई-पुणे महामार्गावर काही खाजगी वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सीटबेल्ट न लावता, मोबाईलचा वापर करताना अतिवेगाने वाहने चालवितात, असे आढळून आले आहे. अशा धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुणे, नवी मुंबई, मुंबई, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनांवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याबददल दंडात्मक कारवाई करुन वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
*प्रवाशांच्या माहितीकरिता माहिती फलके*
मुंबई- पुणे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहितीकरिता स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्यामार्फत माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही महामार्गावर ही मोहीम सुरु असल्याबाबतचे 100 फलक लावण्यात आलेले आहेत. सोशल मिडिया मधून सुध्दा यास प्रसिध्दी देण्यात येत आहे.
*मुंबई-पुणे या महामार्गावर दुचाकीवर विनाहेल्मेट प्रवास करणारे प्रवासी व अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या जडवाहन चालकांमध्ये जनजागृती*
वाहनचालकांनी सुरक्षा अभिनयास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जुन्या महामार्गावर गेल्या सात दिवसात एकही अपघात घडलेला दिसून आला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वाहन चालकांमध्ये शिस्तीचे पालन करण्यासाठी मुख्य:त्वे हेल्मेट व अवैध पार्किंगबाबत यापुढेही जनजागृती करण्यात येणार आहे.
*ट्रान्सपोर्ट वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न*
लोणावळा येथून मुंबईकडे येणारा खालापूर टोल नाक्यापर्यंत रस्ता हा उताराचा असल्यामुळे खूप मोठया प्रमाणात ट्रक, टॅंकर, ट्रेलर अशा मालवाहू वाहनांचे मोठया प्रमाणावर अपघात यापूर्वी झालेले आहेत. या ठिकाणी उताराचा रस्ता असून सुध्दा इंधन वाचविण्यासाठी न्युट्रल गिअरचा वापर करुन त्या ठिकाणी अनेक वाहनचालक वाहन चालविताना आढळून आले आहेत. ही गैरसमजूत दूर करण्याच्या हेतूने त्यांचे समुपदेशन करण्यासाठी व त्या 15 किलोमीटरच्या अंतरात एक विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून वाहन चालकांना न्युट्रल गिअरचा वापर न करणे त्याचप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरचा वापर करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. या ठिकाणी वाहन चालकांचे अधिक तांत्रिक पध्दतीने प्रबोधन करण्यासाठी उत्पादक कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यास वाहन चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही जनजागृती यापुढेही सुरू राहणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी परिवहन विभागाने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमास नियमांचे काटेकोर पालन करुन सकारात्मक प्रतिसाद द्यावा व रस्त्यावर सर्वांची सुरक्षा निर्माण करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण महेश देवकाते यांनी केले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग
Tags:
Social News