गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री तीन दिवस बंद
लातूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होत असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. यानिमित्त मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी व मतदानाच्या दिवशी अर्थात 18 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहील. तसेच मतमोजणीच्या दिवशी, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी घोषित केलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर तालुक्यातील 44, रेणापूर तालुक्यातील 33, औसा तालुक्यातील 60, निलंगा तालुक्यातील 68, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 11, देवणी तालुक्यातील 8, उदगीर तालुक्यातील 26, जळकोट तालुक्यातील 13, अहमदपूर तालुक्यातील 42, चाकुर तालुक्यातील 46 अशा एकुण 351 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकासाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तसेच 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी), मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच या कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1)(सी) नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कळविण्यात आले आहे.