गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर शहरात मटका किंग 'गुरुजी' नंतर 'नागु'मटकेवाल्याचा हैदोस
लातूर-शिक्षणाचे क्षेत्र असलेल्या लातूर शहरात मटका व गुटखा यासारखे अवैध धंदे बंद झालेले नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आजही मटका अड्डे शहराच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर सुरू असून लातूर शहरात मटका किंग 'गुरुजी' नंतर 'नागु'मटकेवाल्याने जाळे तयार करुन हैदोस माजवला आहे.विशेष म्हणजे मागील काही महिन्या खाली याच 'नागु'मटकेवाल्याला पोलिसांनी धंधा बंद करण्याचा दम भरला होता परंतू पोलीस यंत्रणेला या मटकेवाल्याला थांबवण्यात यश आलेले नाही. वरिष्ठ अधिकार्यांच्या कारवाईनंतरही अवैध धंदे सुरूच असल्याने कारवाईवरच शंका उपस्थित केली जात आहे. अवैध धंदेवाल्यांशी काही पोलिसांचेच साटेलोटे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची कारवाई केवळ फार्स ठरत आहे.
अवैध धंदे वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. शहरातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विभागाने कारवाया करायला पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे .लातूर शहराच्या चोहोबाजूंनी अगदी हाकेच्या अंतरावर या 'नागु' मटकेवाल्याचा धंधा जोरात सुरू असून याबद्दल शहरात मोठी चर्चा सुरू आहे. मागेही पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली होती; मात्र अवैध धंदे बंद होण्यास याचा काहीच उपयोग झाला नाही ही वस्तुस्थिती आहे.पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मटका थांबणे अपेक्षीत होते परंतू आजही मटका अड्डे सुरूच आहेत.काही ठिकाणी पोलिस कारवाईनंतर हे अड्डे बंद होणे अपेक्षित होते. मात्र बुकींसह यंत्रणेवर काहीच फरक पडल्याचे जाणवत नाही. शहरातील 'नागु' मटका अड्ड्यांचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर अजूनही आलेले नाहीत.आता शहरामध्ये मटका किंग 'गुरुजी' याच्या नंतर 'नागु'मटकेवाल्याचा बोलबाला असल्याची जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी वेळीच लक्ष घालून यावर आवर घालने अवश्यक बनले आहे.