Ads by Eonads
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्याबद्दल "माझं लातूर परिवार" सन्मानित
लातूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत २०२२ या वर्षात शहरात विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवून जनजागृती केल्याबद्दल "माझं लातूर" परिवाराचा उप जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा सुरक्षा समिती, परिवहन विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य रस्ता सुरक्षा अभियान - २०२३ चे उद्घाटन उप जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली डी पी डी सी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, डॉ आनंद कलमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यभर सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो या निमित्त रस्ते सुरक्षा विषयक मार्गदर्शन, प्रबोधन आणि जनजागृती करण्याच्या हेतूने अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. जनजागृती सोबतच वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. वाढती वाहन संख्या, रस्त्यांची दुरावस्था यामुळे होणाऱ्या अपघातांवर प्रकाश टाकत रस्ता सुरक्षा नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उप जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी अध्यक्षपर भाषणात मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी मंचावरील सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित नागरिकांनी रस्ता सुरक्षा विषयक नियम पाळण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमात विना अपघात सेवा देणाऱ्या १३ खाजगी बस वाहतूक चालकांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर २०२२ साली रस्ता सुरक्षा अभियानात पत्रकार आणि वर्तमान पत्र वितरित करणाऱ्या १०२ व्यक्तींना मोफत हेल्मेट वितरण, जनजागृती शिबिर, प्रबोधनपर मार्गदर्शन शिबीर या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देत उपक्रमाला चालना दिल्याबद्दल "माझं लातूर" परिवाराचा विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माझं लातूर परिवाराच्या वतीने सतीश तांदळे, अभय मिरजकर, संजय स्वामी, प्रमोद गुडे, काशिनाथ बळवंते, डॉ सितम सोनवणे, जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी केले तर आभार शहर वाहतूक पोलीस उप निरीक्षक आवेझ काझी यांनी मानले.
रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध वाहतूक संघ, जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी, शहर पोलिस वाहतूक, परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.