बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे व आव्हाने या विषयावर लातुरात राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन
लातूर : ' बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे व आव्हाने ' या विषयावर लातुरात रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष सीए सुनील कोचेटा, रोटरीचे परिसंवाद संचालक जयप्रकाश दगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूर शहरातील श्री दयानंद सभागृहात रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सदर राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न होणार आहे. हा परिसंवाद रोटरी क्लब लातूर, श्री दयानंद शिक्षण संस्था, लातूर व जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना जयप्रकाश दगडे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने ' बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे \ आव्हाने ' या विषयावरील परिसंवादात रोटरीचे प्रांतपाल रुक्मेष जाखोटिया ' नवीन शिक्षण पद्धतीबाबत रोटरी क्लबची भूमिका विशद करणार आहेत. प्रथम संस्था, पुणे चे प्रमुख डॉ. माधव चव्हाण प्राथमिक शिक्षणाची दिशा, प्रा. डॉ. भूषण जोरगुलवार ' माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण धोरण यावर मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडचे प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वरूप या विषयावर तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन ' विद्यापीठीय स्तरावरील शिक्षणामधील धोरणात्मक बदल यावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादाचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - व्याप्ती व आढावा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
रोटरीचे अध्यक्ष सुनील कोचेटा यांनी यावेळी बोलताना या परिसंवादाच्या माध्यमातून जे निष्कर्ष मांडले जातील ते संकलित करून केंद्र व राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड , रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. अवस्थी, रो. डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी रोटरी क्लब लातूरचे सचिव श्रीमंत कावळे, बसवराज उटगे, महेंद्र जोशी,प्रा. मारोती सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.