गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
औसा शहरातील लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाया विरोधात प्रशासनाने दखल घ्यावी ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा,
संतप्त ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव.
>>> शहरात वाढता वेश्याव्यवसाय व अवैध धंद्याच्या विरोधात समस्त जनता एकवटली
औसा/प्रतिनिधी : - सुफी संताची भुमी,वारकरी संप्रदायाच्या परंपरेसह ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराचे पावित्र्य मलीन करण्याचे कार्य औसा शहरातील लॉजचालक करित आहेत. लॉजच्या नावावर चक्क वेश्या व्यवसायासह अवैध धंदे खुलेआमपणे केली जात असल्याने याचा दुष्परिणाम येथील युवापिढीवर होत आहे. वारंवार याबाबत निवेदने तक्रारी देवूनही कुणीही हे धंदे बंद करत नसल्याने समस्त जनता,संतप्त औसेकरांनी लोकलढा उभारत लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसाया बरोबर अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार केला.आज शेकडो महिलासह युवक व नागरिकांनी तहसीलदारासह उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले. यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही वर्षातच शहरात आठ लॉजाबरोबर बालाजी मंदिर परिसरात काॅफी शाॅप उभारले असून लाॅज व परिसरात तरुण-तरुणींचे घोळके दुचाकीवरून ये-जा करताना वावरताना दिसत आहेत. या लाॅज व काॅफी शाॅपना पालिकेची रितसर परवानगीही नाही. प्रशासनाला हाताशी धरुन हा गोरखधंदा चालतो. अल्पवयीन मुलीसह इतरांना आणून चक्क देहविक्रीचा व्यवसाय लॉजच्या नावाआड होत असल्याने याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यावर दिसून येते. लॉजमध्ये प्रवेश देताना आधारकार्ड, इतर ओळखपत्र तपासले जात नसून बिनधास्तपणे अवैधरित्या व्यवसाय करण्याचे ठिकाण बनविण्यात आले.याचे पडसाद शहरातील शांततेवर पडत असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना वाढत आहेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदरचे निवेदन समस्त औसेकरांच्या वतीने देण्यात आले.
त्रिस्तरीय समिती फक्त कागदावरच
सहा महिन्यापुर्वी लॉजवरील अवैध धंद्याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसने उठाव केला होता.त्यावेळी तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांची समिती तयार करण्यात आली होती.यावर महिन्यात एखदा लॉजबाबतची माहिती घेणे,त्यांचे परवानगी तपासणी, रेकॉर्ड तपासणे आदिचा समावेश होता.पण जनतेची समज काढण्यासाठी ही समिती कागदावर झाली. पण त्यानंतर किती बैठका झाल्या. तपासणी करण्यात आली का ? हे सर्व गुलदस्त्यातच आहे. ठरल्याप्रमाणे वरील समितीच्या प्रमुखांने केले असते तर आज हि परिस्थिती उद्भवली नसती.