'वाले इंग्लिश स्कुल'चा समर्थ देवडे महाराष्ट्र क्रिकेट संघात
लातूर : चौदा वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात येथील एकनाथ उर्फ समर्थ संतोष देवडे याची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने १४ वर्षांखालील राज्यस्तरीय आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा पुणे व कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना समर्थ देवडे याने अष्टपैलू कामगिरी केली. सोलापूर क्रिकेट संघाविरोधात त्याने १९८ धावा केल्या. कोल्हापूर क्रिकेट संघाविरुद्ध नाबाद २०३ धावा केल्या होत्या. सदरील स्पर्धेतून बज पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या ३० जणांच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. त्यातही नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू ठरलेल्या संतोष देवडे याची १४ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.
सदर स्पर्धेमध्ये त्याने एकूण ७७२ धावा व १२ खेळाडूंना बाद केले आहे. दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून बडोदा (गुजरात) येथे आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचा मुंबई विरुद्ध सामना होणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यांसोबत क्रिकेट सामने होणार आहे. १२ वर्षीय समर्थ देवडे हा येथील बसवणआप्पा वाले इंग्लिश स्कूल येथे इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून तो लातूर येथील पॅकर्स क्रिकेट क्लबचा सदस्य आहे.
त्याला उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राम हिरापुरे, ज्येष्ठ क्रिकेटपटू उल्हास भोयरेकर, रणजी खेळाडू तसेच महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे सहाय्यक व प्रशिक्षक आशिष सूर्यवंशी, फिरोज शेख, अभय गडकरी, नवनाथ डांगे, क्रीडा प्रशिक्षक जयराज मुंडे, इम्रान सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Tags:
SPORTS