गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेच्या पूर्वतयारीचा
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आढावा
· वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेविषयी कार्यवाहीच्या सूचना
लातूर, दि. 13 (जिमाका) : श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयातर्फे आयोजित केली जाणारी महाशिवरात्री यात्रा 18 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी सर्व शासकीय विभाग आणि श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाने समन्वयाने काम करून यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे सहायक आयुक्त तथा श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले यावेळी उपस्थित होते.
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व शासकीय विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. मंदिर परिसरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीचा विचार करून त्यांच्या वाहतूक, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. मंदिर परिसरात पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याद्वारे गर्दीचे नियंत्रण करावे. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि धोक्याची सूचना देणारी यंत्रणा, सुरक्षित वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. तसेच अन्न व औषध प्रशासनाने यात्रा कालावधीत विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांचे वेळोवेळी नमुने घेवून तपासणी करावी. विषबाधेसारखे प्रकार टाळावेत, असे त्यांनी सांगितले.
मंदिर परिसरात धोक्याची सूचना देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व परिसरात पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. येथील आनंद मेळाव्यात उभारण्यात येणाऱ्या साहित्याचे इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिक फिटनेस तपासण्याची कार्यवाही करायच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महानगरपालिकेमार्फत भाविकांच्या सोयीसाठी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रस्ते, स्वच्छता व इतर बाबींचेही नियोजन करण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ढगे यांनी विविध शासकीय विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.