Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे- एक उत्तम प्रशासकीय महिला सनदी अधिकारी




        बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी औरंगाबाद सिडको मुख्य
प्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळ-
मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरणार आहेत. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती झाली होती मात्र,त्या रूजू झाल्या नव्हत्या.
     बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती.शेवटी त्यांची बदली मंगळवारी झाली असून, त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ-मुंडे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.    
       सर्वसामान्य कुटुंबातील श्रीमती मुधोळ-मुंडे या 2010-11 बॅचच्या आयएएस अधिकारी असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाची नेहमीच सर्वत्र प्रशंसा झाली. पुढे औरंगाबाद जीएसटी विभागात सेवा केल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उस्मानाबादकरांवर आपल्या कामाची उत्तम छाप पाडली. उस्मानाबाद मध्ये अतिशय लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपले नाव कमावले. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी जिल्ह्यात उल्लेखनीय उपाययोजना राबविल्या. नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी कर्तव्यदक्ष सेवेला प्राधान्य देणाऱ्या जिल्हाधिकारी म्हणून आजही उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जनता त्यांची आपुलकीने आवर्जून आठवण काढते. बालविवाह, हुंडाप्रथा आणि स्त्रीभ्रूणहत्या अशा अनिष्ट प्रथेचा समूळ नायनाट होण्यासाठी त्या नेहमीच सक्रिय राहिल्या.त्या अनुषंगाने टास्क फोर्स ची निर्मिती करून जनजागृतीवर अधिक भर देत आल्या. निर्भीड, कर्तव्यदक्ष आणि प्रसंगी शासकीय सेवेत कसूर करणाऱ्यावर गरजणाऱ्या जिल्हाधिकारी असल्याने ज्या जिल्ह्यात त्यांची बदली होते तिथे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळता भुई थोडी होते. मात्र प्रामाणिक आणि चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी त्या तितक्याच खंबीरपणे उभ्याही राहतात.
      पर्यावरण रक्षण तसेच प्रदूषण नियंत्रण याचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी तसेच त्याकरिता जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज सायकलवरून जाणाऱ्या व जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांनाही सायकलचा अधिकाधिक वापर करायला प्रोत्साहित करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे धडे जिल्ह्यातील जनतेमध्ये देत प्रदूषणावर आळा बसविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांनी जे विविध उपक्रम स्वतः मैदानात उतरुन यशस्वीपणे राबविले, त्याची सकारात्मक चर्चा उस्मानाबाद जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात आजही होते.
      सर्वसामान्य नागरिकांसाठी आपुलकीने,तळमळीने,प्रामाणिकपणे, पारदर्शीपणाने काम करणाऱ्या अशा महिला जिल्हाधिकारी लाभल्याने आता बीडकरांना नक्कीच बीड जिल्ह्याची पारदर्शक, गतिमान प्रशासकीय यंत्रणा लवकरच पाहावयास मिळणार आहे.
Previous Post Next Post