सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांची प्रतिक्रीया
लातूर दि.०२- देशातील गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक, महिला, युवा या सर्वांचा विचार करून सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केला. सात लाखापर्यंत आयकराची सुट देणारा, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारा आणि पंतप्रधान आवास योजनेत ६६ टक्यांची आर्थिक वाढ करून सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केली.
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचा चालू पंचवार्षीक कार्यकाळातील शेवटचा आणि अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेच्या सभागृहात आज बुधवारी सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सितारमन यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. नैसर्गिक खताचा वापर वाढवून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांसह शेती क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. नव्या कर रचनेमुळे कराचा भार कमी होणार असून महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्राची घोषणा करण्यात आली आहे.
मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना भरारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणाऱ्या या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देशातील विशेषतः महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकट करण्यास प्राधान्य दिले असून साखर उद्योगातील दहा हजार कोटी रूपयाचा जूना कर माफ केल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गोरगरीब मध्यम वर्गीयांसाठी असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत ६६ टक्के आर्थिक वाढ करून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठा हातभार लावला आहे.
रस्ते उभारणी, हायवेची बांधणी आणि उर्जा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून देशाला आत्मनिर्भर करणारा त्याचबरोबर गरजवंताच्या गरजा पुर्ण करणारा, छोटया उद्योजकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे असे आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले आहे.
Ads by Eonads