गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये एका घरात वेश्याव्यवसाय करणार्या कुंटणखान्यावर छापा : एका आंटीसह पीडित महिला जाळ्यात
लातूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरात सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पोलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवून शनिवारी पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले असून, कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक महिला घरामध्येच बाहेरगावाहून महिलांना बोलावून घेत त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवीत होती... याची खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने एक बनावट ग्राहक त्यांच्याकडे पाठवत घरावरच छापा मारला. घटनास्थळी दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याकडून मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आंटी स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरगावाहून महिलांना स्वतःच्याच घरात ठेवून, त्यांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची कबुली पीडित महिलांनी दिली.
काही रक्कम देऊन आमच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी आटीला अटक केली आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुर नं. १३० / २०२३ कलम ३७० भादंवि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ ही कारवाई पोलिस निरीक्षक गोरख दिवे, सपोनि संदीप कामत, पोउपनि श्यामल देशमुख, पोउपनि सुभाष सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, लता गिरी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे चालक मणियार यांच्या पथकाने केली.