शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातबाजीवर केला कोट्यावधीचा खर्च
मुंबई : काही महिन्यांपूर्वी ठाकरे सरकारला बाजूला सारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवे सरकार बसविले. सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करण्यात कुठलीही कसर सोडली नसल्याचे धक्कादायक माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बातमी संपुर्ण महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती. त्यांनी म्हटले आहे की, नुकतेच राज्य शासनाकडून हे देयके मला उपलब्ध झाली. यात धक्कादायक माहिती अशी की, या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातील शासकीय पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणा-या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का हा प्रश्न आहे असे देखील नितीन यादव यांनी म्हटले आहे.
सर्वात जास्त खर्च हर घर तिरंगा जाहिरातींवर
यात विशेष म्हणजे काही उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. यात सर्वात जास्त खर्च हर घर तिरंगा या उपक्रमावर करण्यात आल्याचं दिसत आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी १० कोटी ६१ लाख ५६८ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर केंद्राचा उपक्रम असलेल्या बूस्टर डोसच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ८६ लाख ७० हजार ३४४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी ४ कोटी ७२ लाख ५८ हजार १४८ रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले असल्याचे आता उघड झाले आहे