ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या महाशिवरात्री यात्रेची जय्यत तयारी
मध्यरात्री होणार दुग्धाभिषेक
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण
लातूर/प्रतिनिधी:लातुरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मध्यरात्री गवळी समाज बांधवांच्या वतीने केल्या जाणाऱ्या दुग्धाभिषेकाने यात्रेस प्रारंभ होणार आहे.शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापुजा व ध्वजारोहण होणार आहे.
यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.कोविडनंतर प्रथमच उत्सव होत असल्याने भक्त मंडळी आणि नागरिकात प्रचंड उत्साह दिसून येत आहे.यात्रेसाठी देवस्थान समिती आणि व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे.बालगोपाळांसाठी यात्रेत मेजवानी असणार आहे.आनंदनगरीची उभारणी पूर्ण झाली आहे.विविध प्रकारची मनोरंजनाची साधने यंदा यात्रेत असणार आहेत.खवय्यांसाठीही यात्रेत मेजवानी असणार आहे.
मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक केला होणार असून त्यानंतर दर्शन सुरू होईल.
शनिवारी सकाळी १०वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते श्रींची महापूजा केली जाईल.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन केले जाईल.यानंतर माळी समाजबांधव व संत सावता माळी भजनी मंडळाच्या वतीने मिरवणूक काढून पुष्पवृष्टी केली जाईल.शनिवारी दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदिरापासून पारंपारिक झेंडा मिरवणूक काढली जाईल.सिद्धेश्वर मंदिरात मिरवणुकीचा समारोप होईल.
यात्रा महोत्सवात दररोज विविध कार्यक्रम होणार आहेत.या यात्रा महोत्सवाचा शहर व जिल्ह्यातील भक्तांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर,स्वागत समितीचे प्रमुख विक्रमतात्या गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी,मन्मथप्पा लोखंडे,बाबासाहेब कोरे,अशोक भोसले,नरेशकुमार पंड्या,सुरेश भोसले यांच्यासह विश्वस्त मंडळ आणि विविध समिती प्रमुखांच्या वतीने करण्यात आले आहे.