Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रवींद्र धंगेकर यांचा कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

रवींद्र धंगेकर यांचा कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय


पुणे : कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते.

हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करू शकली नाही.

अखेर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.

रासनेंसमोर धंगेकरांचे तगडे आव्हान
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ५०.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजेच, २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केले होते. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. धंगेकरांनी भाजपच्या रासनेंसमोर तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले होते.

मतमोजणीपूर्वीपासूनच राजकीय वर्तुळात भाजपच्या हातून पारंपरिक मतदारसंघ काँग्रेस हिसकावून घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या.

सामान्यांचे नेते म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख
रवींद्र धंगेकर मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे सुरुवातीपासूनच ठरले होते.

पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या धंगेकरांनी रासनेंना एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पारंपरिक मतदारसंघ हिसकावला.
Previous Post Next Post