Ads by Eonads
आमदार, खासदार तुपाशी, कर्मचारी मात्र उपाशी !
थाळीनाद करुन सरकारला जागवण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न
लातूर, दि.20 : जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने बेमुदत संप सुरुच ठेवलेला आहे. मात्र या संपाला काही लोकप्रतिनिधी विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकप्रतिनिधींना पेन्शन मिळते, मात्र जवळपास 30 वर्षे काम करुनही कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही. म्हणूनच आमदार, खासदार तुपाशी, कर्मचारी मात्र उपाशी ! अशी परिस्थिती सध्या राज्यातील असल्याचे मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे निमंत्रक संजय कलशेट्टी यांनी सांगितले.
शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सुरुवात केल्याबद्दल शासनाचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत. परंतू जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपात सहभागी राहतील, असेही त्यांनी सांगितले.
आजच्या संपाच्या सलग सातव्या दिवशी थाळीनाद आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मध्यवर्ती कर्मचारी संघटना व सर्व संलग्न व विविध पाठिंबा दिलेल्या संघटनांनी केला. आजच्या दिवशी महिला वर्गासह पुरुष कर्मचाऱ्यांचा मोठयाप्रमाणात सहभाग होता.
या संपाच्या स्थळी आमदार धीरज देशमुख, सुर्यकांत विश्वासराव यांनी लातूरच्या कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता पाहून भेटी दिल्या. त्यावेळी आमदार देशमुख यांनी, मी फक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी लातूरचा सुपूत्र म्हणून याठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यास आलेलो आहे, असे सांगत संपास पाठिंबा दिला.
जिल्हाध्यक्ष बी .बी. गायकवाड, संस्थापक अध्यक्ष आर. एस. तांदळे, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव पांचाळ, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष संतोष माने, सचिव धुमाळ, तलाठी महासंघ जिल्हाध्यक्ष महेश हिप्परगे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अरविंद कुलगुर्ले, माहिती व जनसंपर्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे दत्तात्रय सूर्यवंशी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाई श्रृंगारे, संजीव लहाने, सुदेश परदेशी, मनोज बनकर, हनमंत नागिमे, बालाजी फड, बालकराम शिंदे, मंगेश पाटील, प्रथमेश वैद्य, उमेश सांगळे, अशोक किनीकर, संजय जाधव, सुमित्रा तोटे, सय्यद वाजीद आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.