Ads by Eonads
व्हाईस ऑफ मिडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी विनोद बोरे यांची निवड
बोरे करणार राज्य कार्यकारिणी अन् जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती, साप्ताहिकाशी संबंधित प्रश्न सोडविले जाणार
बुलढाणा, ता. 17: देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी लेखक-संपादक विनोद बोरे यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ग्रामिण प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ही निवड केली आहे. विनोद बोरे हे सात पुस्तकांचे लेखक आहेत. सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीमध्ये आणि देशोन्नतीच्या मुख्य संपादकीय कार्यालयात असे एकूण सात वर्ष उपसंपादक म्हणून राहिले आहेत. त्यांच्या जनस्वप्नपूर्ती या साप्ताहिकाचे ते संपादक-मालक आहेत.
साप्ताहिक विंगची राज्य कार्यकारिणी अन् महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती विनोद बोरे करणार आहेत. याद्वारे राज्यातील सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आहेत. साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकिय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्विकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक- पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, म्हाडाच्या घरकूल योजनेच्या आरक्षणामध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळणे, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमधून साप्ताहिकाच्या संपादकांना निधी मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनांची माहिती मिळावी आदी प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे.
Tags:
Social News