वेदांत विवेक मुगळीकर निर्मित “डायरी ऑफ विनायक पंडित “पहिल्या वाहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये !
लातूर आणि सिनेमा हे समीकरण नवीन नाही आणि आता यात अजून एका लातूरकराचे नाव सिनेसृष्टीत येत आहे लातूरचा भूमिपुत्र व शाहु सायन्स कॅालेजचा ११/१२ चा विद्यार्थी असलेला वेदांत विवेक मुगळीकर निर्मित “डायरी ऑफ विनायक पंडित “पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
वेदांत हा पिंपरी चिॅचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत असलेले व लातुर निवासी असलेले राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक वसंतराव मुगळीकर यांचा मुलगा असुन त्याचे फिल्म मेकिंगचे शिक्षण हे जगविख्यात “न्यूयॉर्क फिल्म इंस्टिट्युट “मध्ये झालेले असून त्याच्या “द रनर”,”१०० डेज “या लघुचित्रपटांना आंतरराट्रीय स्तरावर गौरविलेले आहे.
चित्रपट निर्मिती चे स्वप्न बाळगून वेदांत ने पुण्यामध्ये आदित्य देशमुख याच्या सोबत “चित्रबोली क्रिएशन्स “या चित्रपट निर्मितीसंस्थेची सुरुवात केली आणि या अंतर्गत मयूर शाम करंबळीकर लिखित आणि दिग्दर्शित “डायरी ऑफ विनायक पंडित “या मराठी सिनेमाची निर्मिती केली. या चित्रपटाला २१ व्या “पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “दोन पुरस्कार प्राप्त झाले त्यात एक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि दुसरे सर्वोत्कृष्ट प्रॅाडक्शन डिझाईन चे होते. तसेच हा चित्रपट मुंबई येथील महाराष्ट्र शासनाच्या “यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल “मध्येही नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता.फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात डायरी ऑफ विनायक पंडित ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
डायरी ऑफ विनायक पंडित या सिनेमाचे चित्रीकरण पुणे,सातारा,रहिमतपूर,ब्रह्मपुरी या भागात झालेले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अविनाश खेडेकर,सुहास शिरसाट,पायल जाधव असून चित्रपटाचे संगीत निरंजन पेडगावकर आणि आनंदी विकास यांचे आहे. चित्रपटातील गाण्यांना पद्मश्री शंकर महादेवन, अभय जोधपूरकर,जयदीप वैद्य,प्रियांका बर्वे आणि लातूरचा मंगेश बोरगावकर यांनी स्वरसाज चढवला आहे.
येत्या काळात चित्रपट तसेच वेब सिरीज ची निर्मिती करणे आणि नवीन कलाकृती रासिंकांसमोर आणण्याचा मानस वेदांत चा आहे.२६ मार्च ते २८ मार्च मध्ये होणाऱ्या पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “डायरी ऑफ विनायक पंडित हि २८ मार्च २०२३ रोजी दाखवण्यात येणार आहे. “
चित्रपटामध्ये वेदांत विवेक मुगळीकर आणि आदित्य विकासराव देशमुख यांनी निर्माते म्हणून काम पहिले आहे तर व्यंकट मुळजकर,हृषीकेश जोशी, विनय देशमुख,समीर सेनापती यांनी सह निर्माते म्हणून भूमिका बजावली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर यांनी केले असून लेखन दुर्गेश काळे यांनी केले आहे.