Ads by Eonads
व्हीएस पँथर्सच्यावतीने विविध न्याय
मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन : विनोद खटके
लातूर : लातूर शहराच्या डॉ. आंबेडकर पार्क याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फुटी ब्रॉन्झ धातूचा नवीन पुतळा उभारण्यात यावा, डॉ.आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करण्यात यावे या आणि इतर विविध न्याय मागण्यांसाठी सोमवार, दि. २० मार्च २०२३ रोजी लातुरात व्हीएस पँथर्सच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्हीएस पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या महामोर्चाला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून प्रारंभ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून हा महामोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल,असे सांगून विनोद खटके पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, डॉ. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जासाठी लागणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन कर्जाची रक्कम वाढवण्यात यावी,गावरान जमिनीवर भोगवट दारांना हक्क अभिलेख पत्र ( कबाले ) देऊन त्यांना स्थायिक करण्यात यावे, बांधकाम कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता व स्टेशनरीमध्ये वाढ करावी, भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची रक्कम वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टीतील नागरिकांना कबाले देण्यात यावेत, बांधकामाच्या साहित्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता रमाई व इंदिरा आवास योजनेच्या अनुदानात पाच लाखापर्यंत वाढ करावी, सन २००५ पासून शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, एक गाव एक स्मशानभूमी करण्यात यावी, मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, लातूर शहरातील शाहू चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण विनाविलंब करण्यात यावे, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे मैदानाचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जाऊ नये आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे विनोद खटके यांनी सांगितले.
हा महामोर्चा समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने काढला जात असून या महामोर्चात नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सभागी व्हावे,असे आवाहनही विनोद खटके यांनी यावेळी केले. याप्रसंगी व्हीएस पँथर्सचे प्रदेश अध्यक्ष सचिन मस्के, संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष बालाजी बनसोडे, विशाल सुरवसे, अमोल कांबळे, एड. किरण पायाळ , एड. प्रतीक कांबळे, राहुल कांबळे, असद शेख, करण कांबळे, संतोष जाधव, किरण किवंडे, दाजीबा कांबळे, धनराज सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.