गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
निलंबित मुख्याध्यापक व लिपिकाने शासन व प्रशासनाची केली आर्थिक फसवणूक
संस्था सचिव प्रा. डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली लेखी तक्रार.
लातूर लातूर शहरातील दत्तनगर, औसा रोड येथील श्री दत्तकृपा शिक्षण संस्थेच्या श्री सदानंद प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील लाचखोर आणि विविध आर्थिक घोटाळे केल्या प्रकरणी निलंबित असलेले मुख्याध्यापक सुधाकर पोतदार व लिपिक शशिकांत खरोसेकर यांनी त्यांच्या निलंबित काळातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन बेकायदेशीररित्या स्वत:च्या अधिकाराता वेतन पारित करुन घेतले. तसेच शालेय आहाराचे ६५ हजार रुपये फेब्रुवारी मार्च २०२३ दरम्यान उचलून शासकीय रक्कमेचा अपहार केला आहे. शासन प्रशासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित निलंबित मुख्याध्यापक सुधाकर पोतदार व निलंबित लिपिक शशिकांत खरोसेकर यांच्यावर आणि याप्रकरणी प्रशानातील दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे लेखी तक्रारी निवेदन श्री दत्तकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर यांच्याकडे दिले आहे. तसेच संबंधित निलंबित मुख्याध्यापक पोतदार आणि निलंबित लिपीक यांच्याकडून सदरची रक्कम वसुल करावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
सदानंद प्राथमिक विद्यामंदिरचे निलंबित मुख्याध्यापक सुधाकर पोतदार व लिपिक शशिकांत खरोसेकर यांनी संगणमत करुन मुख्याध्यापक पोतदार यांच्या पत्नीची खोटी कागदपत्र तयार करुन शाळेत नेमणूक दाखवली. तसेच लातूर अर्बन बँकेकडून खोट्या कागदपत्राव्दारे कर्ज उचलले. शिवाय शालेय पोषण आहारात १ लाख ४ हजार ८७० रुपयांचा अपहार केला. तत्कालीन शिक्षणाधिकार्याच्या खोट्या स्वाक्षर्या करुन शिक्ष्ज्ञकांना अनाधिकृत नेमणूका दिल्या.
तसेच या चालू शैक्षणिक वर्षात सेमी इंग्रजी, परीक्षा फी व प्रवेश फी च्या नावावर विद्यार्थी व पालकांकडून सुमारे २९ लाख रुपये बेकायदेशीर जमा करुन मोठा गैरव्यवहार केला. तसेच अर्जित रजेसाठी एका शिक्षिकेकडून ६ हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक अधिकार्यांनी मुख्याध्यापक पोतदार व लिपिक खरोसेकर यांना रंगेहात पकडून कार्यवाही केली होती. या सगळ्या घोटाळ्यांमुळे आणि गैरप्रकारांमुळे शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केलेले आहे. मात्र सदर संस्थेवरील प्रशासक तथा उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी त्यांना बेकायदेशीरपणे दि. ८ फेबु्रवारी २०२३ पासून पुन्हा त्याच पदावर नेमणूक केली.
त्यानंरत देखील संबंधित निलंबित मुख्याध्यापक पोतदार २० फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ या काळात अर्जित रजेवर असल्याची नोंद शिक्षक हजेरी पटावर आहे. त्यांची ही रजा कोणी मंजूर केली, तसे करता येते का ? असा सवाल निवेदनात डॉ. कुलकर्णी यांनी केला आहे. त्यानंतर पुन्हा ३ ते १७ मार्च २०२३ या काळात अर्जित रजा घेतल्यानंतरही याच काळात शालेय पोषण आहाराचे ६५००० रुपये उचलून अपहार केला.
तरी शिक्षण उपसंचालक लातूर यांनी संबंधित दोषींवर सखोल चौकशी करुन कठोर कार्यवाही करावी. तसेच त्यांच्याकडून अनाधिकृत उचलले वेतन आणि शालेय पोषण आहाराची अपहार केलेली रक्कम वसुल करावी व दोषींच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संस्थापक सचिव प्रा. डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी निवेदनात केलेली आहे.