गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
२० हजार कोटींचा घोटाळा दडपण्यासाठी भाजपने माझी खासदारकी रद्द केली; राहुल गांधींचा गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळेच अदानी यांच्या बोगस कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. ही गुंतवणूक कोणी केली, हा प्रश्न मी वारंवार विचारत आहे. त्यामुळे आपले पितळ उघडे पडले याची भीती पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना वाटत आहे. त्यामुळेच माझी खासदारकी रद्द करण्यात आली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. ते शनिवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गौतम अदानी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मी गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी संसदेत विचारलेले प्रश्न, मोदी-अदानी संबंधाविषयी उपस्थित केलेल्या शंका आणि लोकसभा सचिवालयाकडून त्यांच्यावर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई या सगळ्याचे बिंदू जोडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार मी संसेदत प्रश्न विचारले तेव्हापासून सुरु झाला. मी एकच प्रश्न विचारला होता, गौतम अदानींच्या बोगस कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? अदानी हे व्यावसायिक आहेत, पण बोगस कंपन्यांमध्ये गुंतवलेला हा पैसा त्यांचा नाही. या सगळ्यात एका चिनी व्यक्तीचा समावेश होता. मी संसदेत याबाबतचे पुरावे दिले. पंतप्रधान मोदी आणि अदानींच्या नात्याबाबत बोललो. मोदी आणि अदानी यांचं जुनं नातं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदींची अदानी यांच्याशी घट्ट मैत्री आहे. पण माझ्या लोकसभेतील भाषणाचा भाग वगळण्यात आला. अदानी यांना संरक्षण विभागात आणि देशभरातील विमानतळांचे कंत्राट नियम बदलून देण्यात आले. मी या सगळ्याविषयी प्रश्न विचारायला गेलो तर मला बोलून दिले जात नाही. माझ्या भाषणाचा भाग का वगळला, याविषयी मी लोकसभा अध्यक्षांना दोनवेळा चिठ्ठ्या दिल्या, पण उत्तर आले नाही. त्यानंतर मी लोकसभा अध्यक्षांच्या दालनात गेलो. मला बोलून का दिले जात नाही, असा प्रश्न त्यांना मी विचारला. त्यावर लोकसभा अध्यक्ष फक्त हसले. मी काहीच करू शकत नाही, असे ओमप्रकाश बिर्ला यांनी म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला
माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी माफी मागत नाहीत: राहुल गांधी
अदानी यांच्या बोगस कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, असे केंद्र सरकारला वाटले. मात्र, मी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पंतप्रधान मोदींना भीती वाटली. त्यामुळे आता सुरु असलेला सारा प्रकार हा २० हजार कोटींचा घोटाळा दडपण्यासाठी सुरु आहे. जनतेला माहिती आहे की, अदानी भ्रष्ट व्यक्ती आहे. मग देशाचे पंतप्रधान त्यांना का वाचवत आहेत? माझ्याकडे खासदारकी असू दे किंवा नसू दे मी काम करतच राहणार. माझी खासदारकी कायमची रद्द केली, मी संसदेत असेन किंवा नसेन, पण मी आवाज उठवत राहीन, प्रश्न विचारत राहीन, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.
Tags:
Crime News