Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित रुग्णालयास अखेर शासनाची मंजुरी

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित रुग्णालयास अखेर शासनाची मंजुरी

विद्यमान पालकमंत्र्यांचे माजी पालकमंत्र्यांनी मानले आभार



*लातूर शहरातील गाव भागात १०० कोटी रुपये खर्च करून उभारले जाणार अद्यावत
स्त्री व बाल रुग्णालय

*दोन तळघर + तळमजला + ५ मजली भव्य रुग्णालय इमारत

*२०० बेडसह सर्व प्रकारच्या अद्यावत सोयी सुविधांनी सज्ज होणार रुग्णालय





लातूर( प्रतिनिधी) – २७ एप्रिल २०२३

     लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
वतीने लातूर शहराच्या गाव भागातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभाग
तसेच बालरोग शास्त्र विभाग सुरू करण्यासाठी माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री
तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले
असून शासनाने यासाठी तब्बल ९४ कोटी ३६ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला
आज मंजुरी दिली आहे.

    आमदार अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना लातूर
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विस्तारासाठी जागा
कमी पडत असल्याचा मुद्दा समोर आला तेव्हा लातूर महापालिकेने या
विस्तारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती,
महापालिकेकडून गाव भागातील पटेल चौक परिसरात जागा उपलब्ध करून
देण्यासंबंधी प्रस्ताव आल्यानंतर तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार अमित देशमुख प्रस्तावाला
तत्वता मान्यता दिली होती

    गाव भागातील पटेल चौक परिसरातील स्त्री रुग्णालयाच्या ठिकाणी
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने उभारावयाच्या
स्त्री व बाल रुग्णालयास तत्वता मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम
विभागाने नियोजित आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर केलेला होता. सदरील
प्रस्तावास विद्यमान शासनाकडून मंजुरी मिळावी म्हणून माजी मंत्री आमदार
देशमुख सातत्याने पाठपुरावा करीत होते. विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन
यांनी महाविद्यालयाची गरज आणि जागेची उपलब्धता या गोष्टींचा सांगोपांग
विचार करून अखेर या विस्तारित रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळवून
दिली आहे. या प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल माजी पलकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले
आहेत, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी महाराष्ट्र शासन लवकरात लवकर
उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .

  लातूर शहराच्या गाव भागात २ तळघर + तळमजला + ५ मजले अशी भव्य इमारत या
रुग्णालयासाठी उभी राहणार आहे. स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह आणि बाल
रुग्णालयासाठी जवळपास २०० बेड येथे उपलब्ध होणार आहेत. विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी सर्व
अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. बाह्य रुग्णालय कक्षापासून येथे
महिला व बालकांच्या सर्व प्रकारच्या दुर्धर आजारावर उपचार होणार आहेत.

   लातूर शहराच्या गाव भागात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे नव्या युगाचे अद्यावत विस्तारित स्त्री व बाल रुग्णालय
उभा राहणार असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते
उपयुक्त ठरणार आहे. लातूर गाव भागातील तसेच जिल्हाभरातील महिला व बालके
यांना या ठिकाणी चांगले उपचार मिळणार आहेत, अधिकाधिक रुग्णांना येथे
उपचार मिळणार असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर
शिक्षणासाठीच्या अधिकच्या जागा मंजूर होतील त्यामुळे गोरगरीब नागरिक तसेच
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे रुग्णालय उपयुक्त ठरेल असा विश्वास
आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
Previous Post Next Post