काळे कपडे घालून वृक्ष तोडीचा निषेध
लातूर -
जसे की सर्वांना माहीतच आहे मागील १४०६ दिवसापासून ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य पिवळा टी-शर्ट परिधान करून संबंध जिल्ह्यामध्ये झाडे लावणे, झाडे जगवणे, शहराचे सुशोभीकरण, शहर स्वच्छता, जनजागृती,प्रबोधन करण्यामध्ये अग्रेसर आहे.
२०१५-१६ मध्ये रुक्ष, भकास दिसणारे लातूर शहर आता हिरवेगार आणि सुंदर दिसत आहे.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी जिवापाड मेहनत करून शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात झाडे लावून झाडे जगलेली आहे. बार्शी रोडवरील ९० टक्के झाडे लातूर वृक्ष-ग्रीन लातूर वृक्ष टीमने लावून जगवली व जोपासली आहेत. पण मागील पाच-सहा दिवसापासून बार्शी रोडवरील झाडांची विनाकारण छाटणी केली जात आहे असं लक्षात आले आहे. सर्वत्र छाटलेल्या फांद्यांचा ढीग दिसून येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकातील झाडे खूप सुंदर पद्धतीने वाढलेली होती, झाडांची गर्द सावली देणारी एक गुफा तयार झालेली होती, आणि या मागील चार-पाच दिवसापासून महानगरपालिका लातूर प्रशासनाने झाडांची छाटणी केल्यामुळे ही झाडांची गुफा पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. अशा प्रकारच्या वृक्षतोडीचा निषेध म्हणून आज काळे कपडे घालून बार्शी रोडवरील झाडांना पाणी देत आपलं दैनंदिन १४०७ व्या दिवसाचं कार्य पूर्ण केलं. हा निषेध व्यक्त करताना अशा पद्धतीने वृक्षतोड शहरांमध्ये होऊ नये अशी मागणी प्रशासनाला करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे झाडांचे प्रमाण वाढवायचे असतील तर वृक्ष तोडीला पूर्णपणे आळा घालून वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाकडे अग्रक्रमाने लक्ष देणे गरजेचे आहे असं मत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि अत्यंत दुःखी मनस्थिती मध्ये त्यांनी आज चे कार्य संपन्न केले.