महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार
: डॉ. अरविंद भातांब्रे
लातूर : लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी आपण बुधवार, दि. १९ एप्रिल २०२३ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी रविवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉ. भातांब्रे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस कोरनेश्वर स्वामीजी उस्तुरी, संगनबसव स्वामी निलंगा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अरविंद भातांब्रे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला पहिली संसद दिली, लोकशाही दाखवून दिली. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या कारणावरून हटविण्यात येणे ही बाब समाजाच्या भावनांना दुखावणारी आहे. हा केवळ लिंगायत समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजनांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने हा पुतळा हटविण्याचा प्रयत्न केल्यास समाज त्याला प्रचंड विरोध करणार आहे. हा पुतळा हटविण्यात येऊ नये,अशी आपली आग्रही मागणी असून प्रशासनाला दि. १८ एप्रिल पर्यंतचा अल्टीमेटमही दिला आहे. १८ एप्रिलपर्यंत प्रशासनाने हा पुतळा हटविण्यात येणार नाही, अशी लेखी हमी नाही दिल्यास आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. आपल्या या आमरण उपोषणास लिंगायत समाजासह अनेक संघटना, समाजाचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरनेश्वर स्वामीजी यांनी यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वर हे केवळ लिंगायतांचेच नव्हे तर समस्त बहुजन समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व असून त्यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये ही समाजाची मागणी अत्यंत रास्त आहे. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांच्या भावना दुखावून पुतळा हटविण्याचा विचार योग्य नाही. प्रशासनाने पुतळा हटविण्याच्या निर्णयाबाबत समाजाच्या भावनांचा विचार करून हा पुतळा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. संगनबस्व महाराज यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाला हा पुतळा आहे त्या ठिकाणाहून न हटविण्याची विनंती केली. समस्त लिंगायत आणि बहुजन समाज अत्यंत सहनशील आहे. पुतळा हटविण्याचा निर्णय घेऊन या समाजाला कठोर भूमिका घेण्याची वेळ आणू नये,असे आवाहनही संगनबस्व स्वामी जी यांनी केले. त्याचबरोबर यावेळी लताताई मुद्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बसवराज धाराशिवे, राजाभाऊ राचट्टे, स्मिता ताई खानापुरे, पूजाताई पंचाक्षरी, ओमप्रकाश झुरूळे, बालाजीअप्पा पिंपळे, नितिन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, रोहित चवळे, ओम धरणे, संकेत उटगे , नरेश पेद्दे , राहुल नारगुंडे , गणेश हेरकर, ऋषी झुंजे, बसवराज रेकूळगे , विजय शेटे , सतीश पानगावे, संजय बावगे, सुनील ताडमाडगे, नितीन नारगुंडे, संतोष सुलगुडले, सोनू डगवाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.