गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उपकेंद्र लातूर.
बी. फार्मसी तृतीय वर्गाच्या विद्यार्थ्यांचा ऑडिटिंग द्वितीय विषयाचा पेपर आऊट ऑफ सिल्याबस काढणाऱ्या संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी...
उपरोक्त विषयास अनुसरून निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 च्या बी ए, बी कॉम, बी एससी, बी फार्मसी अशा विविध विभागाच्या परीक्षा सुरू आहेत. यामध्ये 24 एप्रिल 2023 रोजी बी फार्मसी तृतीय वर्षाचा ऑडिटिंग द्वितीय (अंकेक्षण) या विषयाचा पेपर होता त्या विषयाच्या पेपरमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे त्या विषयाच्या पेपरच्या 75 मार्कापैकी 35 मार्काचा पेपर आऊट ऑफ सिल्याबस म्हणजेच अभ्यासक्रमाच्या बाहेरचा असलेला पाहायला मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला व विद्यार्थ्यांना त्या विषयाचा पेपर सोडवता आला नाही. प्रश्नपत्रिका मधील पहिलाच प्रश्न हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा होता आणि पहिला प्रश्न 20 मार्काचा अनिवार्य असतो त्या प्रश्नाला पर्यायी प्रश्न नसतो त्यामुळे आणखीन अधिकच विद्यार्थ्यांची अडचण झाली. एवढेच नाही तर एकाच युनिट वरती 50 मार्क चे प्रश्न हे या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले पाहावयास मिळाले एकाच युनिटवर 50 मार्काचे प्रश्न असू शकतात का? हा खूप मोठा प्रश्न आहे. यातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सावळा गोंधळ लक्षात येतो. यापूर्वी सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनेक बाबतीतला भोंगळ कारभार हा आमचा निदर्शनास आलेला आहे त्याउपर कालचा बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या या गलथान कारभारामुळे आणि ढसाळ नियोजनामुळे झालेल्या चुकीची सजा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे त्यामुळे या गंभीर प्रश्नावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या परीक्षा विभागातील ज्यांनी ही चूक केली आहे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी तसेच योग्य तो मार्ग काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. त्याचबरोबर परीक्षा विभागाच्या या चुकीच्या कामामुळे विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये अथवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या बाबीची काळजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, प्रशासन आणि परीक्षा विभाग यांनी घ्यावी.
परीक्षा विभागाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यापीठ प्रशासन असेल तसेच यावर योग्य तो मार्ग काढला नाही गेला तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडल व त्या आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व नुकसानी जबाबदार हे विद्यापीठ प्रशासन असेल याची नोंद घ्यावी असा इशारा देवून मनसे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संघटक महेश माने, मनसे जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी, मनसे रेनापुर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुंडे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बालाजी कांबळे, मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी योगेश सूर्यवंशी, योगेश डोंगरे, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इत्यादी महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.