ठाकरे-शिंदे गटाचा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा निकाल नेमका काय आहे?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवाळ यांनी दिलेला निर्णय हा बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यातील सत्तांतरानंतर गेले १० महिने सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन निर्णय आज, गुरुवारी देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने यावरील ऐतिहासिक व दूरगामी निकाल दिला. नऊ दिवसांच्या सलग सुनावणीनंतर १६ मार्च रोजी यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता माजी सरन्यायाधीश अहमदी यांची शोकसभा झाली. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं. शिवसेना नेमकी कोणाची, राज्यातील बंडखोरी व सत्ताबदल कायदेशीर की घटनाबाह्य अशा प्रश्नांभोवती फिरणारी सत्तासंघर्षाची सुनावणी गेल्या महिन्यात संपली. राज्यघटनेचे दहावे परिशिष्ट, राज्यपालांची भूमिका, नबाम रेबिया व कर्नाटकातील एस. आर. बोम्मई यांसारख्या पूर्वीच्या प्रकरणांच्या निकालांचा उल्लेख युक्तिवादादरम्यान झाला.
Tags:
Social News