व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाभरात धरणे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
न्याय्य मागण्यांसाठी पत्रकार उतरले रस्त्यावर
लातूर , प्रतिनिधी
पत्रकार आणि वर्तमानपत्रांबाबतच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना विविध मागण्यांचे निवेदन देवून पत्रकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
समाजातील सर्व घटकांचे प्रश्न मांडून पत्रकार त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. पण, पत्रकारांचेच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पत्रकारांनी आपल्या मनोगतातून अनेक महत्वपूर्ण मागण्या प्रशासनासमोर मांडल्या तसेच आपल्या भावनांना मनोगतातून वाटही करुन दिली.
पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोना महामारीत जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात, साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजी फड, सरचिटणीस संगम कोटलवार, शहाजी पवार, सुशांत सांगवे, डॉ. सितम सोनवणे, बाळासाहेब जाधव, सचिन चांडक, वामन पाठक, विनोद चव्हाण, विष्णू अष्टेकर, आनंद माने, श्रीराम जाधव, योगिराज पिसाळ, काकासाहेब घुटे, प्रभाकर शिरुरे, दिलिप मुनाळे, धोंडीराम ढगे, रंगनाथ सगर, दिपक आलापूरे, वैभव पुरी, यशवंत पवार आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.