नीट परीक्षेला लातूर शहरात तब्बल २५ हजार विद्यार्थी सामोरे जाणार
लातूर: एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली प्रवेश पात्र नीट परीक्षा रविवारी (दि. ७) लातूर जिल्ह्यातील ५६ केंद्रांवर होणार आहे. नीट परीक्षेस २५ हजार २०० विद्यार्थी सामोरे जाणार आहेत.. यावर्षी परीक्षार्थीचा आकडा जवळपास चार ते साडेचार हजारांनी फुगल्याने प्रशासनाला केंद्रांची संख्या वाढवावी लागली.
लातूर पॅटर्नच्या शिरपेचात गुणवत्तेचा तुरा असल्याने राज्यासह देशभरातून डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगून असलेले विद्यार्थी येथे नीट, जेईईच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी येथे येतात. यामुळे लातूर शहराला आता शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दरवर्षी लाख, दीड लाख विद्यार्थी लातूर शहरात नीट, जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करण्यानिमित्त येतात. यावर्षी नीट परीक्षार्थीची संख्या वाढल्याने केंद्रांची संख्या वाढवावी लागली. ग्रामीण भागातही परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्रांची संख्या ५६ वर गेली आहे.
गतवर्षी परीक्षा केंद्रांची संख्या सुमारे ४२ च्या घरात होती. यावेळी लातूर शहरासह कोळपा, गंगापूर, आर्वी, बाभळगाव, औसा, हसेगाव, आलमला,
अहमदपूर, उदगीर येथे नीट प्रवेश परीक्षेची केंद्र असणार आहेत. यावर्षी सुमारे १४ परीक्षा केंद्र नव्याने वाढले असून, या नीट परीक्षेसाठी तीन सिटी कॉर्डिनेटरची (समन्वयक) नियुक्ती केली आहे. त्यात राहुल आठवले, राज साखरे, सच्चिदानंद जोशी यांचा समावेश आहे. नीट परीक्षेस येणाऱ्या परीक्षार्थीना ड्रेसकोडमध्ये यावे लागणार आहे. नीट परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आता जिल्हा पातळीवरील शहरापर्यंत पोहोचली असून, या एजन्सीने नीट परीक्षेचे सुक्ष्म नियोजन केल्याचे सांगण्यात आले.
लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रांवर परीक्षा
महावितरण, पोलिसांची मदत
नीट परीक्षेदरम्यान, वीज गायब होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने महावितरणला सूचना दिल्या आहेत. तसेच नीट परीक्षेस २५ हजार २०० परीक्षार्थी असल्याने शहरात वाहनांची गर्दी होणार. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली असून, तशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले. गर्दी वर्षीचा अनुभव पाहाता यावर्षी वाहतुकीमुळे कोणाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे सूचित केले आहे. बरेच परीक्षार्थी खासगी वाहनाने नीट परीक्षेस येतात. यावर्षी तर परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी पोलिसांना नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी नीट परीक्षेच्या तयारी संबंधी आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रशासनाने रविवारी (दि. ७) सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केले आहे. तसेच परीक्षार्थीची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठकीत सांगितले.
परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थीना येण्यास सकाळी ११ पासून परवानगी देण्यात आली आहे. नीट परीक्षा दुपारी २ ते ५.२० दरम्यान, पार पडेल,