"रीड लातूर" कडून आयोजित बेस्ट रीडर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग.
विजेत्या १३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडलचे वितरण
लातूर :-- वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या "रीड लातूर" उपक्रमांतर्गत "बेस्ट रीडर" ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.
सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने "रीड लातूर" उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.या उपक्रमांतर्गत लातूर ग्रामीण मधील रेणापूर औसा व लातूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात पुस्तके देण्यात आली. सदरील पुस्तके बहुतांश इंग्रजी भाषेतील असून या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचा वाचनाकडे कल वाढत असल्याचे दिसून आले. जागतिक स्तरावरील नामांकित लेखकांची पुस्तके विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाला चालना देणारी ठरत आहेत. "रीड लातूर" उपक्रमास नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. यादरम्यान जवळपास ३३०० विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला.नुकताच संबंधित शाळांमधील गट १ ते ४ व ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी "बेस्ट रीडर" ही स्पर्धा शालेय स्तरावर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण १३० विजेते विद्यार्थ्यांना सौ.दीपशिखा धिरज देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व मेडल देऊन शाळेतील मुख्याध्यापक व पालक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भारत सातपुते, रावसाहेब भामरे,सौ.मंदाकिनी भालके, शिवलिंग नागापुरे, आर.डी.गायकवाड, विजयकुमार कोळी, सुरेश सुडे, विजय माळाळे, राजकन्या मुस्के, मनोज राठोड, शिवलिंग नागापुरे,सविता धर्माधिकारी, क्षीरसागर बी.एम.,राठोड ए. बी.,ठाकूर एस.वाय,बेद्रे दत्तात्रय, घोडके एन.जी, सुवर्णकार एस. के., मुर्कीकर मॅडम यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती "रीड लातूर" उपक्रमाचे समन्वयक राजू सी पाटील यांनी दिली आहे.