गृहप्रमुख, गृहपाल आणि मुख्याध्यापक यांच्या कामाचा
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतला आढावा
लातूर, दि. 22 (जिमाका) : लातूर विभागातील गृहप्रमुख, गृहपाल आणि मुख्याध्यापक यांच्या कामकाजाचा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्रवेश पूर्ण करावेत. तसेच विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिल्या.
लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उस्मानाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे, लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. तेजस माळवदकर, सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, नांदेडचे सहाय्यक आयुक्त बापु दासरी यांच्यासह लातूर विभागातील सर्व गृहप्रमुख, गृहपाल तसेच शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
वसतिगृहामध्ये पालक मेळावे घेण्यात यावेत. गृहपाल यांना देण्यात आलेल्या घरवापसी या उपक्रमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. तसेच वसतिगृहामध्ये विदयार्थ्यांसाठी सुसंवाद कार्यक्रम दरमहा आयोजित करण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिल्या.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या यशोगाथा पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या येाजनांवर आधारित माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शासकीय वसतिगृह व मिनी ट्रॅक्टर योजनेच्या ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. सर्व गृहपाल यांना शासकीय वसतिगृह ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबतच्या सॉफ्टवेअरबाबत यावेळी माहिती देण्यात आली.