गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महा-ई-सेवाकेंद्राने अतिरिक्त शुल्क घेतल्यास केंद्राची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश
भाजपायुमोच्या निवेदनाची तहसिलदाराकडून तत्काळ दखल
लातूर दि.25-06-2023
विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्राच्या चालकांकडून भरमसाठ पैसे उकळले जात असल्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार भाजयुमोने निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी या केंद्र चालकांना तंबी दिली आहे.अतिरिक्त शुल्क घेणे बंद करा अन्यथा नोंदणी रद्द करू अशी सुचनाही तहसीलदारांनी या पत्राद्वारे महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेली आहे.
तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रातून विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी,पालक व नागरिकांची गर्दी होत आहे.याच बाबीचा गैरफायदा घेत संबंधित केंद्र चालक व दलाल मनमानी करत आहेत. विविध प्रमाणपत्रांसाठी आव्वाच्यासव्वा दर आकारला जात आहे. कुठल्याही केंद्रावर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार्या शुल्काचे फलक लावलेले नाहीत.
या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी आवाज उठवला होता.या केंद्रावरून होणारी विद्यार्थी व सामान्य नागरिकांची लूट थांबविण्यासाठी तहसीलदारांना साकडे घालण्यात आले होते.
तहसीलदारांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेतली.संबंधित केंद्रचालकांना पत्र देऊन केली जाणारी लूट थांबविण्याचे निर्देश दिले. केंद्र चालकांनी कसलेही अतिरिक्त शुल्क न घेता सेवा द्यावी. सेवाशुल्क आकारणीचे फलक दर्शनी भागात लावावेत.शासनाने निर्देशित केलेल्या शुल्का व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम घेतल्याचे निदर्शनास आले तर संबंधित महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार केंद्राची सेवा तात्काळ रद्द करण्यात येईल,असे निर्देश तहसीलदारांनी या पत्राद्वारे दिलेले आहेत. त्यामुळे या केंद्रावरून होणारी विद्यार्थ्यांची लूट बंद होणार असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
भाजयुमोच्या पत्राची दखल घेत सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी पावले उचलल्याबद्दल अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भाजयुमोच्यावतीने तहसीलदारांचे आभार मानले आहेत.