गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पुण्यात सीबीआयची छापेमारी, _अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्तांची झाडाझडती, प्रशासानाचे धाबे दणाणले_
[ महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकल्याने खळबळ उडाली. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असे छापा टाकण्यात आलेल्या अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची मोठी कारवाई.
सीबीआयच्या छापेमारीमुळे महसूल विभाग आणि प्रशासनातील अनेकांचे धाबे दणाणलेत. या कारवाईची दिवसभर चर्चा सुरू आहे. एका लाचप्रकरणात तक्रार केल्यामुळे ही कारवाई झाल्याचे समजते.
*कागदपत्रे घेतली ताब्यात:*
सीबीआयच्या पथकाने पुण्यातील कॅम्प परिसरातील लष्कर भागातील शासकीय वसाहतीत सदरची कारवाई केली. शासकीय वसाहतीत राहणाऱ्या महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापा टाकून कारवाई करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात देखील सीबीआय अधिकारी दाखल होऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे. सीबीआयच्या पथकाकडून महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
*लाचेची मागणीः*
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रामोड यांनी हायवे लगत असलेल्या जागेचा परतावा लवकर मिळावा यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत सीबीआयने छापेमारी करत अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.
*नाना तर्क-वितर्क:*
महसूलमधल्या अधिकाऱ्याच्या घरावर थेट सीबीआयने छापेमारी केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. नेमके प्रकरण कशाचे आहे, याची खुसखुशीत चर्चा महसूल विभागात होतेय. मात्र, यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. आता सीबीआय छापेमारी झाल्यानंतर पुढे काय, राज्य सरकार काही कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.