खरीप हंगाम - 2023 मध्ये एक रुपयात पिक विमा भरण्यास सुरुवात;
अंतिम मूदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी वेळेत पिक विम्यात सहभाग नोंदवावा
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन
· प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात विमा प्रस्ताव सादर करण्याची 31 जूलै अंतिम मुदत
लातूर,दि.5(जिमाका)- खरीप हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात विमा प्रस्ताव सादर करण्याची 31 जूलै, 2023 ही अंतिम मुदत आहे. यावर्षी पिक विमा हा फक्त १ रुपयात काढून मिळणार असून भरपूर शेतकरी विमा भरतील व यामुळे शेवटच्या टप्यात तांत्रीक अडचणी निर्माण होतात म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वेळेत विमा भरून सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे लातूर यांनी केले आहे.
कर्जदार शेतक-यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पिक बदलाबाबत सुचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापुर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल. तरी शेवटच्या टप्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बॅकेत / नागरी सुविधा केंद्र मार्फत पिक विमा संरक्षण घ्यावे.
तसेच विमा सहभाग नोंदवताना आपला मोबाईल क्र. इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहीती एस.एम.एस द्वारे शेतकऱ्यांना दिली जाईल. सी.एस.सी. केंद्र / बँक यांनी शेतकऱ्यांकडून तलाठ्यामार्फत साक्षांकीत केलेला सातबारा देण्याचा आग्रह करु नये सी.एस.सी. केंद्र चालकांनी विना शूल्क विमा भरुन घ्यावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात, एसबीआय इन्शुरन्स विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा www.pmfby.gov.inया संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करुन घेता येईल.
तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पिक पाहणी या मोबाईल ॲप वर अचूक माहिती नोंदवावी. विमा संरक्षित पिक व ई-पिक पाहणी मध्ये नोंदवलेले पिक यात तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पिक पाहणी मध्ये नोंदवलेले पिक अंतिम ग्रहीत धरण्यात येईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.