मनपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख उद्यान (नाना -नानी पार्क) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील ६० वर्षावरील नागरिकांना विरंगुळा मिळावा,त्यांचे सामाजिक,सांस्कृतिक व आरोग्य विषयक हित जपले जावे या संकल्पनेतून मनपाने हे विरंगुळा केंद्र सुरू केले आहे.ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या पाहता अशा केंद्रांची गरज होती.या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना वाचण्यासाठी विविध वृत्तपत्रे,पुस्तके यासह बुद्धिबळ व कॅरम सारखे बैठे खेळ असणार आहेत. ज्येष्ठांच्या सोयीसाठी या केंद्रात वजन मोजणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.मनपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाकडे या विरंगुळा केंद्राचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे.
शनिवारी (दि.१जुलै) रोजी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण झाले.या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ.काशिनाथराव सलगर, सचिव प्रकाशराव घादगिने यांच्यासह मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी ज्येष्ठांसाठी अशी केंद्र गरजेची असल्याचे मत व्यक्त केले. मागणी आणि उपयुक्तता लक्षात घेता जागेच्या उपलब्धतेनुसार शहरात अशी आणखी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले. प्रकाशराव घादगिने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्यासह दयानंद हुल्ले,क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, ग्रंथपाल अमित म्हेत्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.अमित म्हेत्रे यांनीच आभार प्रदर्शनही केले.
या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजय राजुरे, मालमत्ता व्यवस्थापक रवी कांबळे,महिला व बालविकास अधिकारी रुक्मानंद वडगावे यांच्यासह वसंत बेंडे, सदाशिवराव पोटे, अशोकराव कुलकर्णी, अशोकराव मार्कंडे, भगवानराव देशपांडे, रमेशराव भोयरेकर, रामचंद्रराव तांदळे,डॉ. मोतीचंद जगळे,डॉ.सी.एम.जोशी,सुरेश कुलकर्णी,विनोद जोशी या ज्येष्ठ नागरिकांचीही उपस्थिती होती.