गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पुण्याच्या बी. यू. भंडारी ऍटो
कंपनीला ग्राहक मंचचा दणका
दुरूस्त गाडीसह, भरलेल्या रकमेवर व्याज, ३५ हजारांचा केला दंड
लातूर, दि.१२ -
पुण्याच्या बी. यू. भंडारी ऑटो प्रा. लि. कंपनीने लातूर येथील माधव रामराव पाटील यांच्या व्होल्कस् व्हॅगन व्हेन्टो गाडीच्या दुरूस्तीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा तिप्पट रक्कम लावून मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास दिल्याने लातूर येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने सदर कंपनीला भरलेले ७५ हजार रुपये व्याजासहित देणे, चालू अवस्थेतील गाडी व इतर ३५ हजार रुपयांचा दंड पंधरा दिवसांच्या आत देण्याचा निर्णय दिला आहे.
येथील माधव पाटील यांनी मागील काही वर्षांपूर्वी व्होल्कस् व्हॅगन व्हेंटो कार खरेदी केली होती. तेव्हापासून सलग सात वर्षे पुण्याच्या बी. यू. भंडारी कंपनीतच तिच्या सर्व्हिसिंग केल्या. मागील ऑक्टोंबर २०२२ मध्ये सदर गाडीचे दुरूस्ती काम व सर्व्हिसिंगसाठी भंडारी यांच्या शोरूममध्ये पाठविण्यात आली. माधव पाटील यांनी गाडीचे काम सांगितल्यानंतर सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. त्यासाठी ऍडव्हान्समध्ये ७५ हजार रुपये देण्यात आले. गाडी दुरुस्त करून १५ दिवसांत देण्याचे ठरले होते. परंतु, तीन महिने झाले तरी गाडी दिलीच नाही. त्यानंतर माधव पाटील यांनी सदर कंपनीकडे चौकशी करून दुरुस्त झालेली गाडी देण्याची मागणी केली. त्यावेळी सदर गाडीच्या दुरुस्तीसाठी ७ लाख ७८ हजार ३८९ रुपये ५० पैसे एवढा खर्च झाल्याचे सांगून ती रक्कम आणून गाडी घेऊन जाण्यास ई- मेल पाठवून सांगितले. ठरल्यापेक्षा तिप्पट बिल केल्याने माधव पाटील यांनी लातूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली.
ग्राहक तक्रार निवारण मंचात दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाला. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्षा रेखा जाधव व सदस्य रवींद्र राठोडकर यांच्या मंचाने माधव पाटील यांच्या बाजुने निकाल देत भरलेल्या ७५ हजार रुपयांसह त्यावर ६ टक्के व्याज देऊन रक्कम परत करावी, चालू अवस्थेतील गाडी परत द्यावी, त्याचबरोबर माधव पाटील यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हव्यासापोटी निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत २० हजार रुपयांचा दंड, गाडीअभावी झालेल्या मानसिक त्रासापोटी १० हजार रुपयांचा दंड व प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल करण्यासाठी आलेला ५ हजार रुपयांचा खर्च पंधरा दिवसांत देण्याचे आदेश न्यायालयाने सदर बी. यू. भंडारी ऍटो प्रा. लि. कंपनीला दिले आहेत.
ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे माधव पाटील यांच्यावतीने ऍड. असीफ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. अल्ताफ काजी यांनी युक्तीवाद केला. कंपनीच्यावतीने ऍड. जी. व्ही. कोडाळे यांनी काम पाहिले.