राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे अखेर भाजपच्या गळाला लागले असून, भाजपचे ‘मिशन अजितदादा’ हे फत्ते झाले आहे. अजित पवारांनी आपल्या आठ समर्थक आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळात अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले असून, त्यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार हे मंत्री झालेले आहेत. या सर्व आमदारांना राज्यपालांनी मंत्रिपदाची पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजितदादांसोबत गेलेले सर्व आमदार हे शरद पवार यांच्या खास मर्जीतील असल्याने हा राजकीय भूकंप शरद पवारप्रणित (?) असल्याची जोरदार चर्चा राजधानी मुंबईत सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिकयुद्ध चालू होते. ते वाकयुद्ध म्हणजे, अजितदादांना भाजपसोबत जाण्यासाठीचे ‘कव्हर फायरिंग’ होते, अशीही राजकीय चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विकासाला प्राधान्य द्यावे म्हणून हा निर्णय घेतला आहे.परंतू ते पक्ष अणि पक्ष चिन्ह ही सोबत असल्याचे बोलत आहेत याचा अर्थ शिवसेना सारखी राष्ट्रवादी पक्षाची हालत होते की काय..?अशी चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे.आता पक्ष आणि पक्ष चिन्हावर अजित दादा दावा करणार का..? अशी चर्चाही आता उघड होवू लागली आहे.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज थेट सहभागी होण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली. दादांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. राज्यात वर्षभरानंतर पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे गट शिवसेना आणि भाजपच्या युतीत अजितदादा पवार यांचा गट आला. अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादा यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या राज्याच्या या नाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून नव्या राजकीय समीकरणाचा राज्याच्या विकासाला याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा पवारांनी साथ दिली आहे. अजितदादा यांनी विकासाचे राजकारण केले असून काम करणाऱ्या नेत्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, तेव्हा अशा घटना घडतात, असे म्हणत महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार
अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन) ,दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहापूर), शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहाने (अकोले), अशोक पवार (शिरूर), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर) , सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), दिलीप मोहिते (खेड आळंदी)
शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)
ही यादी समोर आली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन ते तीन दिवसात याबाबत सांगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी आमच्याकडे सर्व आमदार असून तुम्ही काही काळजी करू नका, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात संख्याबळ कोणासोबत जास्त आहे हे समोर येईल.