लातुरात क्रिडाई ऑगस्ट अखेरपर्यंत करणार पाच हजार वृक्षांची लागवड
--------------------------------------------------------------------------------
२०० वृक्षांच्या लागवडीने उपक्रमाची केली सुरुवात
लातूर : लातूर क्रिडाईच्या वतीने "ग्रीन लातूर, क्लीन लातूर" उपक्रमाअंतर्गत लातूर शहरात येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. बुधवारी लातुरातील गोशाळा परिसरात २०० वृक्ष लावून या उपक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाचा शुभारंभ लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांच्या हस्ते गोपूजा करून करण्यात आला.यावेळी क्रिडाईचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, सचिव संतोष हत्ते, कल्चरल कमिटीचे प्रमुख, प्रोजेक्ट चेअरमन किरण मंत्री, सहसचिव श्रीकांत हिरेमठ, क्रिडाईचे माजी अध्यक्ष सुबोध बेळंबे, दीपक कोटलवार , वर्ष २०२५ - २७ चे होणारे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष महेश नावंदर, अमोल मुळे, सहसचिव विष्णू मदने, तसेच वुमन विंगच्या संयोजिका श्रीमती रिचा नावंदर, युथ विंगचे संयोजक आकाश कोटलवार यांसह क्रिडाई परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले विचार व्यक्त करताना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी लातूर शहर व परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. क्रिडाई संघटनेप्रमाणे अन्य संघटनांनीही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
क्रिडाईचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना क्रिडाईच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पाच हजार वृक्ष लागवडीचा हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या ऑगस्ट २०२३ पर्यंत यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असून लावण्यात आलेल्या वृक्षांची योग्य ती जोपासना क्रिडाई सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.