कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना कोर्टाचा दिलासा
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या थेट प्रवेशावर दिल्ली उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. न्यायालायाने विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना दिलासा दिला असून शनिवारी ही याचिका फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात कुस्तीपटू अमित पंघाल आणि सुजित कलकल यांनी ही याचिका दाखल केली होती. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना खटल्यांमध्ये देण्यात आलेल्या सूटच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात सर्वोत्तम कुस्तीपटू कोण हे आम्ही ठरवणार नाही. यामध्ये प्रक्रिया पाळली जाते की नाही हे आम्ही पाहू शकतो.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी अंडर-२० विश्वविजेता अमित पंघल आणि २३ वर्षांखालील आशियाई चॅम्पियन सुजित कलकल यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या दोन्ही खेळाडूंनी विनेश आणि बजरंगला स्पर्धेत थेट प्रवेश देण्याविरुद्ध अपील केली होती. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना मंगळवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या तदर्थ समितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट प्रवेश दिला. २२ आणि २३ जुलै रोजी इतर कुस्तीपटूंच्या चाचण्या होत आहेत. या निर्णयाला पांघळ आणि कलकल यांनी आव्हान दिले होते.