गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून ५८ कोटी रुपयांची फसवणूक
नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. नागपूर सायबर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असता आरोपीच्या घरातून तब्बल १० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले. एवढी रोकड पाहून पोलिसांनाही धक्का बसला. रोकड मोजण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी कॅश मोजण्याचे यंत्र मागवले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सायबर आणि गुन्हे विभागाची विशेष टीम तयार केली आहे.
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, एका व्यक्तीने ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. फिर्यादीनुसार, आरोपीने एका ॲपद्वारे फसवणूक केली. हा प्रकार तक्रारदाराला समजल्यानंतर त्याने पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी धमक्या देण्यास सुरुवात केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक तपासात तथ्य आढळून आल्यावर पोलिसांनी गोंदिया येथील आरोपीच्या घरावर छापा टाकला. आरोपीच्या घरातून १० कोटी रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर पोलिसांनी नोट मोजण्याचे यंत्र मागवून ही रक्कम मोजली.