मांजरा प्रकल्प भागवतोय लातूरची तहान ;मनपा हद्दीसाठी घरणीच्या पाण्याचा विचार नाही -आयुक्तांचे स्पष्टीकरण
लातूर/प्रतिनिधी: धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून लातूर शहरास पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर मनपा हद्दीतील नागरिकांची तहान भागत असून घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी लातूरसाठी घेण्याचा प्रस्ताव नाही,यासंबधी मनपाने कोणताही ठराव अथवा निर्णय घेतलेला नाही असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिले.
गेल्या कांही दिवसांपासून घरणीचे पाणी लातूरला देण्यात येऊ नये यासाठी त्या परिसरात नागरिकांचे आंदोलन सुरू आहे.प्रत्यक्षात हे पाणी लातूर महानगरपालिका क्षेत्रासाठी घेतले जाणार नाही.केवळ लातूरचा उल्लेख होत असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.विविध माध्यमातून आणि सोशल मीडियातूनही घरणीचे पाणी लातूरला देण्यास विरोध होत असल्याच्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुळात महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना गरजेचे असणारे पाणी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून घेतले जाते.या प्रकल्पात सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे घरणीच्या पाण्याचा लातूरसाठी विचार केलेला नाही. विविध माध्यमांतून होणाऱ्या चर्चा पाहता महानगरपालिका क्षेत्राचा उल्लेख वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे.हे पाणी मनपा हद्दीत येणार नाही.संबंधितांनी याची दखल घ्यावी आणि लातूर मनपा हद्दीतील नागरिक व प्रशासना बाबत रोष व्यक्त करू नये,असे आवाहनही आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.